रस्त्याचे काम करणाऱ्या मजुरांना मारहाण केली अन् दगडही मारला! आता भोगावे लागणार दोघांना एक वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा.
Apr 5, 2024, 11:46 IST
देऊळगाव राजा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा)
रस्ता रुंदीकरणाचे काम करत असलेल्या दोघांना मारहाण केल्याप्रकरणी दोन जणांना सश्रम एक वर्षाची शिक्षा देऊळगाव राजा न्यायालयाने सुनावली आहे. २०१९ सालचे हे प्रकरण आहे. याबाबत देऊळगाव राजा तालुक्यातील बोरखेडी बावरा येथील कंकाळ यांनी २९ डिसेंबर २०१९ ला सिंदखेडराजा पोलीस स्टेशन तक्रार दिली होती.
घटनेच्या दिवशी सायंकाळी ५:३० वाजता देऊळगाव राजा ते सिंदखेड राजा मार्गांवरील वनराई हॉटेल नजीक कंकाळ आणि त्यांचे सहकारी सुनील सुतार हे रोडरुंदीकरणाचे काम करीत होते. त्यावेळी समाधान विनायक शेरे आणि सुनील परसाराम उजाड हे दोघे मोटारसायकलने घटनास्थळी आले.
जे.सि.बी चालक सुनील सुतार यास काम बंद करा असे म्हणून सुनील याने जेसिबीची चाबी हिसकावून घेतली. दोन्ही आरोपींनी सुनील सुतार यांना चापटाबुक्क्यांनी मारहाण केली. समाधान शेरे याने बाजूला पडलेला दगड घेऊन कंकाळ यांच्या उजव्या डोळ्याच्या भुवईवर मारून जखमी केले व जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर जखमी कंकाळ यांनी सिंदखेड राजा पोलीस स्टेशन गाठले. समाधान शेरे, सुनील उजाड या दोघांविरुद्ध तक्रार नोंदविली. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला.
सदर गुन्ह्याचा तपास पो.हे.कॉ. अरुण मोहिते यांनी तपास करून आरोपींविरुद्ध वि.न्यायालयात आरोप पत्र दाखल केले. प्रकरणात सरकार पक्षा तर्फे सहा साक्षीदार तपासले. पक्षातर्फे वि.सहाय्यक सरकारी अभियोक्ता अनिल शेषनारायण शेळके यांनी मा.सर्वोच्च न्यायालयाचे न्याय निवाडे दाखल करून भरीव युक्तीवाद केला. अंतिम युक्तीवाद मा.दिवाणी व फौजदारी न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश श्री शैलेश कंठे यांनी ग्राह्य धरून आरोपीस दोषी ठरवून आरोपी समाधान शेरे व सुनील उजाड यांना भा.द.वि.कलम ३२४ मध्ये प्रत्येकी एक वर्ष सश्रम करावास व प्रत्येकी पाच हजार दंडाची शिक्षा सुनावली. तसेच भा.द.वि.चे कलम ३२३ मध्ये दोन्ही आरोपींना तीन महिन्याची साध्या कारवासाची कैद व प्रत्येकी एक हजार दंड अशी शिक्षा सुनावली आहे. तसेच दंडाची रक्कम न भरल्यास तीन महिने साधा कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली.
सरकार पक्षा तर्फे सहाय्यक सरकारी अभियोक्ता अनिल शेळके यांनी कामकाज बघितले तर कोर्ट पैरवी म्हणून पो.हे.कॉ.सुरेश गवई, ना.पो.का.जयश्री दंदाले यांनी सहकार्य केले.