...म्‍हणून सिंदखेड राजा, देऊळगाव राजा तालुक्‍यात वाढताहेत चोऱ्या!

ठाणेदारांनी सांगितले कारण अन्‌ उपायही सूचवला!!
 
file photo

देऊळगाव राजा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः देऊळगाव राजा, सिंदखेड राजा तालुक्यात गेल्या काही दिवसांत घरफोड्या, चोरीच्या घटना वाढल्या आहेत. त्‍यामुळे पोलिसांनी तपासासोबतच जनजागृतीही सुरू केली असून, ग्रामस्‍थांना अशा घटनांपासून वाचण्यासाठी उपाय सूचवले आहेत. सिंदखेड राजा पोलीस ठाण्याचे ठाणेदार केशव वाघ स्वतः गावागावात जाऊन ग्रामस्‍थांना मार्गदर्शन करत आहेत.

आज, २४ नोव्हेंबरला गोळेगावमध्ये ठाणेदारांनी ग्रामस्‍थांशी संवाद साधला. देऊळगाव राजा आणि सिंदखेड राजा तालुक्‍यात चोरीच्या घटना वाढण्याचे कारण स्‍पष्ट करताना ठाणेदार श्री. वाघ म्‍हणाले, की सध्या या दोन्ही तालुक्‍यांतील गावांजवळून समृद्धी महामार्ग जात आहे. महामार्गात शेती गेल्याने शेतकऱ्यांजवळ पैसे असल्यामुळे चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांनी आपल्याजवळ असलेला पैसा, दागदागिने बँकेतच ठेवावेत. गावागावात ग्राम सुरक्षा दल स्थापन करावे, असे आवाहनही त्‍यांनी केले. गावात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची माहिती घ्या. त्‍याच्‍याविषयी काही संशय असेल तर बीट जमादार किंवा मला फोनव्दारे संपर्क साधा, असेही ते म्‍हणाले. यावेळी सरपंच रामेश्वर कोल्हे, उपसरपंच एकनाथराव कोल्हे, पोलीस पाटील विठ्ठल कोल्हे, बाजार समितीचे माजी सभापती रंगनाथराव कोल्हे, तंटामुक्ती अध्यक्ष सचिन कोल्हे, बीट जमादार अरुण मोहिते यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.