चांगल्याचा जमानाच नाही राव! मदतीसाठी थांबले पण भलतच घडल! मेहकर बायपासवरील धक्कादायक घटना..
Jul 18, 2024, 10:51 IST
मेहकर(अनिल मंजुळकर: बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) गाडीचे पेट्रोल संपले आहे! असे सांगून थांबविले.. अन् मदतीसाठी एक सद्गृहस्थ थांबलेही पण पुढे त्यांच्यासोबतच वाईट घटना घडली. चार जणांनी मिळून एका दुचाकीस्वाराला १ लाख रुपयांनी लुटले. मेहकर शहरानजीक बायपास वर काल १७ जुलैच्या दुपारी ही घटना घडली.
याप्रकरणी संतोष साखरे यांनी मेहकर पोलिसांत तक्रार दिली. काल जालना येथून काही पैसे घेऊन ते मेहकर तालुक्यातील आरेगाव येथे येत होते. यावेळी त्यांचे नातेवाइकही त्यांच्यासह होते. आपल्या प्लेटिना कंपनीच्या दुचाकीने ते जालना येथून नातेवाईकांकडून पैसे घेऊन येत होते. दरम्यान, १ वाजेच्या सुमारास दोघेही मेहकर बायपास वर पोहचले. तिथे एक दुचाकी थांबवून चार अनोळखी व्यक्ती उभे होते. त्यांनी साखरे यांना हात दिला. आमचे पेट्रोल संपले हो! असे ते म्हणाले. मदत करायची म्हणून साखरे व त्यांचे नातेवाईक थांबले. पण त्या चौघांनी साखरे यांच्या खिशातून पाच हजाराचा मोबाईल आणि जवळ असलेली १ लाख रुपयाची रोकड हिसकावून घेतली. पैसे उकळून ते अज्ञात चारही जण फरार झाले. यांनतर साखरे यांनी मेहकर पोलीस ठाणे गाठले आणि सगळी घटना सांगितली. तक्रारीवरून अज्ञात दुचाकी चोरट्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पुढील तपास एपीआय संदीप बिराजे करीत आहेत.