लग्नाला आलेला युवक तलावात बुडाला; चिखली तालुक्यातील खोर येथील घटना...

 
Hfjf
सैलानी (बुलढाणा लाइव्ह वृत्तसेवा): लग्नाला आलेला मेहुणा राजा येथील युवक खोर येथील तलावात पोहण्यासाठी गेला असता पाण्यात बुडून मृत्युमुखी पडला. ९ मे रोजी सायंकाळी ही घटना घडली.
अमर विज्ञान काकडे (२१) असे मृत मुलाचे नाव असून, तो मेहुणा राजा येथील रहिवासी होता. गावातील एक लग्न चिखली तालुक्यातील खोर येथे लागण्याकरिता ९ मे रोजी आले होते. या वऱ्हाडासोबत अमर काकडे हादेखील आला होता. विवाह लागून लग्न वऱ्हाड घरी पोहोचले. मात्र, अमर न आल्याने कुटुंबीय चिंतेत पडले. त्याचे वडील विज्ञान काकडे व पत्नीने गावात चौकशी केली असता कोणी काहीच सांगू शकले नाही. दरम्यान, त्यांनी खोर गाव गाठले. तेथील लोकांच्या चर्चेवरून समजले की, एक युवक सायंकाळी सहा वाजता पाझर तलावात पोहण्याकरिता गेला.मात्र, तो पाण्यात बुडाला. काही ग्रामस्थ तसेच पिंजर येथील मानव सेवा सामाजिक विकास कार्य व आपत्ती व्यवस्थापन फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी त्याचा मृतदेह बाहेर काढला. या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास पोहेकों ऋषिकेश पालवे करीत आहेत.