तिला त्‍याच्‍यापर्यंत पोहोचवणारी तरुणीही अटकेत!

१५ वर्षीय मुलीवर २५ वर्षीय विवाहित सलूनचालक करत होता वारंवार लैंगिक अत्‍याचार, मलकापूर तालुक्‍यातील घटना
 
 
मुलगी अटक
मलकापूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः १५ वर्षीय मुलीला त्‍याच्‍याकडे पोहोचविण्यात मदत करणाऱ्या २३ वर्षीय तरुणीलाही मलकापूर शहर पोलिसांनी काल, १५ नोव्‍हेंबरला अटक केली. या मुलीवर २५ वर्षीय विवाहिता सलूनचालक लैंगिक अत्‍याचार करत होता. अटक तरुणीला न्यायालयासमोर हजर केले असता २९ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्‍याचाराची ही घटना १६ ऑक्टोबरला समोर आली होती. पीडित मुलीच्या तक्रारीवरून भूषण मनोहर बोरसे या विवाहित तरुणासह त्याला मदत करणाऱ्या दोन मुलींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. भूषणला पोलिसांनी यापूर्वीच अटक केली होती. त्याला आधी पोलीस कोठडी, नंतर न्यायालयीन कोठडीत ठेवल्यानंतर त्याची रवानगी सध्या जिल्हा कारागृहात करण्यात आली आहे.

या प्रकरणात गुन्ह्यात सहभागी असलेल्या २३ वर्षीय मुलीला पोलिसांनी काल अटक केली. न्यायालयाने तिला २९ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. या प्रकरणातील दुसरी मुलगी अल्पवयीन असल्याने तिच्यावरील कारवाईबाबत न्यायालयाच्या आदेशानुसार पुढील कारवाई करण्यात येईल, अशी माहिती या प्रकरणाचे तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक संजय ठाकरे यांनी दिली.