पत्नी विहिरीत पडली, पतीला पोहता येत नव्हते! चिखली तालुक्यातील सातगाव भुसारीची दुर्दैवी घटना

 
yfyhh
चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बराच वेळ होऊनही पत्नी पाणी घेऊन आली नाही ,त्यामुळे शेतकरी पतीने विहिरीवर धाव घेतली असता पत्नी विहिरीत पडल्याचे पतीच्या लक्षात आले. पतीला पोहता येत नसल्याने त्यांनी आरडाओरड केली. आजूबाजूचे शेतकरी धावत आले मात्र तोपर्यंत विवाहितेचा मृत्यू झाला होता. चिखली तालुक्यातील सातगाव भुसारी शिवारात काल,२३ फेब्रुवारीच्या दुपारी ही घटना घडली. वर्षा प्रदिप कंकाळ (४२, रा.सातगाव भुसारी) असे मृत्यू झालेल्या विवाहितेचे नाव आहे.

वर्षा कंकाळ या पती प्रदीप कंकाळ यांच्यासोबत शेतात गेल्या होत्या. दुपारी शेतात जेवण्याची वेळ झाल्याने वर्षा कंकाळ शेतातील विहिरीवर पाणी आणायला गेल्या. तिथे तोल गेल्याने त्या विहिरीत पडल्या. बराच वेळ होऊन पत्नी पाणी घेऊन न आल्याने पतीने विहिरीवर धाव घेतली. त्यावेळी पत्नी  विहिरीत पडल्याचे त्यांना दिसले.

मात्र प्रदीप कंकाळ यांना पोहता येत नसल्याने त्यांनी आरडाओरड केल्याने आजूबाजूच्या शेतातील शेतकरी धावत आले.मात्र तोपर्यंत वर्षा कंकाळ या बुडाल्या होत्या. घटनेची माहिती मिळताच रायपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून आकस्मिक मृत्यूची नोंद केली. या घटनेमुळे सातगाव भुसारी गावात हळहळ व्यक्त होत आहे.