ट्रकने अचानक ब्रेक दाबले; दुचाकी ट्रकवर आदळली!भीषण अपघातात दोघे जागीच ठार! खामगाव - अकोला रस्त्यावर अपघात..!

 
accident

खामगाव( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): अकोल्याकडे जात असलेल्या ट्रकचालकाने अचानक ब्रेक मारल्याने मागून येणारी भरधाव वेगातील दुचाकी ट्रकवर आदळल्याने झालेल्या अपघातात हिंगणा कारेगाव येथील दोन युवक जागीच ठार झाल्याची घटना सोमवारी रात्री १०.३० वाजेदरम्यान घडली.

खामगाव तालुक्यातील हिंगणा कारेगाव येथील ज्ञानबंधु राजहंस जाधव (वय २५) व राज उर्फ प्रेम सागर बोदडे (वय १६) हे दोघे सोमवारी रात्री १०.३० वाजेदरम्यान एमएच २८, बीजी ३८८५ या क्रमांकाच्या दुचाकीने खामगाववरुन घरी जात होते. दरम्यान, स्वराज पेट्रोल पंपानजीक अकोलाकडे जाणाऱ्या आरजे २७, जीसी ५७८१ या क्रमांकाच्या ट्रक चालकाने अचानक ब्रेक लावले.

यामुळे ट्रकच्या मागे असलेली भरधाव वेगात असलेली दुचाकी या ट्रकवर जोरात आदळली. यावेळी झालेल्या भीषण अपघातात दुचाकी वरील ज्ञानबंधु जाधव व राज उर्फ प्रेम बोदडे हे दोघे जागीच ठार झाले. घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलिस घटनास्थळी दाखल झाले होते.

या अपघातात दुचाकीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या प्रकरणी मृतकचे वडील राजहंस जाधव यांच्या तक्रारीवरुन ग्रामीण पोलिसांनी ट्रक चालक विनोद सेवाराम परमार (वय ३१) रा. मध्यप्रदेश याच्या विरुध्द कलम २७९, ३०४(अ) ४२७ भादंवीनुसार गुन्हा दाखल करून त्यास अटक केली आहे. या घटनेमुळे कारेगाव हिंगणा व गावात शोककळा पसरली आहे.