Amazon Ad

तब्बल ३१ लाख ५० हजारांच्या गांजाची वाहतूक रोखली. चिखली पोलिसांची मोठी कारवाई!

 
चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): खामगाव जालना महामार्गाने जात असलेल्या एका ट्रकमध्ये तब्बल ३१ लाख ५० हजारांचा गांजा आढळून आल्याचा खळबळजनक प्रकार शनिवार,१६ मार्च रोजी चिखली येथे उघडकीस आला. दरम्यान संबधीत अधिकाऱ्यांना व पोलीस विभागाला गुप्त माहिती मिळाल्यानंतर त्यांनी वेळीच ती वाहतूक रोखली व कंटेनर चालकाला ताब्यात घेतले. 
  यूपी २१ सी.एन. ४०३५ क्रमांकाचा एक कंटेनर मधून बेकायदेशीर पणे गांजाची वाहतूक होणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे दुपारी ३ वाजेच्या सुमारास हॉटेल लालपरी येथे संबंधित विभागाचे अधिकारी व पोलीस जमले. त्यांनतर त्या कंटेनरला रोखून झडती घेत असता खाकी रंगाचे खोखे दिसून आले. त्यामध्ये प्रत्येकी ४ किलो वजनाचे पाकिटे आढळली. त्यावेळी बुलढाणा येथून श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले होते. खोख्यांमध्ये गांजा सदृश पदार्थ आढळल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले होते. अखेर पोलीस विभागाच्या श्वान पथकाने त्या पदार्थाचा सुगावा लावला आणि हा आमली पदार्थ गांजाच असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांनी कंटेनर चालक चंद्रपाल जीवाराम (रा. उत्तर प्रदेश) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून ३१ लाख ५० हजार रुपयांचा गांजा व कंटेनर असा एकूण ५१ लाख ५० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
यांनी केली कारवाई! 
सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक मा. सुनिल कडासने, अपर पोलीस अधीक्षक मा. अशोक थोरात, उपविभागीय पोलीस अधिकारी मा. सुधिर पाटील यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक संग्राम पाटील, ठाणेदार चिखली यांचे नेतृत्त्वात सपोनि संजय मातोंडकर, पोउपनि शरद भागवतकर, पोउपनि नितीनसिंह चौहाण, पोलीस अंमलदार विजय किटे, चंद्रशेखर मुरडकर, गजानन काकड, सुनिल राजपुत, सुरज राजपुत, जिल्हा वाहतुक शाखेचे पोनि रवी राठोड यांचे पथकातील निलेश शिंगणे, संतोष चिडे, श्वान पथकातील संजय चाफले यांचे पथकाने केली आहे. सदर गांजा हा आरोपी याने कोठुन आणला, तो कोठे घेऊन चालला होता याबाबत अधिक तपास चिखली पोलीस करीत आहेत.