टँकरने अचानक ब्रेक दाबल्याने दुचाकी धडकली; १ जागीच ठार

१ गंभीर, चिखली तालुक्‍यातील भीषण दुर्घटना
 
 
अपघात

चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः भरधाव टँकरने अचानक ब्रेक दाबल्याने मागून आलेली दुचाकी टँकरला धडकली. यात १ जण जागीच ठार तर दुसरा गंभीर जखमी झाला. खामगाव- चिखली मार्गावरील वैरागड फाट्याजवळील पेट्रोलपंपाजवळ काल, १७ डिसेंबर रोजी रात्री आठच्या सुमारास ही घटना घडली. अफजल काजी एजाज काजी (४२, रा. अमडापूर, ता. चिखली) असे अपघातात ठार झालेल्याचे नाव आहे तर राहुल राम देशमुख (३५) हा गंभीर जखमी झाला आहे.

एजाज काझी आणि राहुल देशमुख हे दोघे दुचाकीने अमडापूरकडे परतत होते. वैरागड फाट्याजवळ त्यांच्या दुचाकीला खामगावकडून येणाऱ्या टँकरने (क्र. एमएच २१ एक्स ८५८४) कट मारला. त्यानंतर टँकरने दुचाकीसमोर जाऊन अचानक ब्रेक दाबल्याने दुचाकी मागून टँकरला धडकली. यात एजाज काझी जागीच ठार झाले तर राहुल देशमुख गंभीर जखमी झाला.

राहुलला उपचारासाठी खामगावच्या सिल्वर सिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. अपघातानंतर टँकरचालक घटनास्थळावरून वाहन घेऊन पसार झाला. मात्र अमडापूर पोलिसांनी त्याला रात्रीच ताब्यात घेतले. आज, १८ डिसेंबर रोजी सकाळी मृतकाच्या काकाने अमडापूर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून टँकरचालक शिवाजी देवराव सानप (२५, सेनगाव, हिंगोली) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.