पक्का खादाड आहे सिंदखेडराजाचा तहसीलदार! रेतीतून कमावतोय काळा पैसा;३५ हजाराची लाच घेतांना पकडल्यानंतर घरात सापडली ३७,५२,१८० कॅश, दुसऱ्या घरातून ९ लाख ४० हजारांची रोकड जप्त..
Apr 12, 2024, 21:41 IST
सिंदखेडराजा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): सिंदखेडराजाचा तहसीलदार सचिन जैस्वाल याला आज ३५ हजार रुपयांची लाच घेतांना बुलडाणा एसीबीने रंगेहाथ पकडले. अवैध रेती वाहतूक करू देण्यासाठी तहसीलदार जैस्वाल तक्रारदाराला ३५ हजार रुपये प्रतीमहिना हप्ता मागत होता. या प्रकरणात तहसीलदाराचा चालक आणि शिपाई देखील अडकला, त्यांच्याच माध्यमातून जैस्वाल तक्रारदाराकडे पैशांचा तगादा लावत होता. दरम्यान या प्रकरणामुळे महसूल प्रशासनात एकच खळबळ उडाली असताना आता या प्रकरणात नवीन अपडेट माहिती समोर आली आहे. तहसीलदार जैस्वाल याच्या सिंदखेडराजा येथील शासकीय निवासस्थानात ३७ लाख ५२ हजार १८० रुपये कॅश स्वरूपात मिळून आले आहेत. दुसरीकडे त्याच्या परभणी येथील घराची तिथल्या एसीबीने झडती घेतली असता तिथेही ९ लाख ४० हजार रुपयांची रोकड सापडली आहे.
सिंदखेड राजा तालुक्यात अवैध रेती उत्खनन सर्रास सुरू असते. महसूल प्रशासन याकडे डोळेझाक का करते याचे उत्तरच आज झालेल्या कारवाईतून समोर आले आहे. ही तर केवळ तहसीलदारांनी मिळवलेली माया आहे, आणखीही खाणारे हात भरपूर आहेत अशी जोरदार चर्चा आहे. स्थानिक पोलीस स्टेशन, जिल्हापातळीवरील पोलीस आणि महसूल प्रशासनातील अधिकारी यांचाही वाटा ठरल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांची आहे. आज झालेल्या कारवाईत सचिन जैस्वाल याच्यासह त्याचा चालक मंगेश शालीग्राम कुलथे व शिपाई पंजाबराव तेजराव ताठे याच्याविरुद्ध सिंदखेडराजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.