Amazon Ad

पोलीस दलात हळहळ! पोलिस निरीक्षक सुभाष दुधाळ यांनी रेल्वेखाली उडी घेऊन जीवन संपवले; रायपुरला ठाणेदार म्हणून गाजवली होती कारकीर्द; सायबर क्राईम मध्येही सोडली होती छाप...

 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): पोलीस विभागातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. बुलडाणा जिल्ह्यात रायपूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार म्हणून कारकीर्द गाजवणाऱ्या सुभाष दुधाळ यांनी रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली आहे.
परळीत त्यांनी आत्महत्या केली. आज, ९ मार्चला सकाळी त्यांचा मृतदेह रेल्वेलाईनवर आढळला. रात्री त्यांनी आत्महत्या केली असावी अशी शक्यता आहे. कर्तव्यदक्ष पोलिस निरीक्षक म्हणून सुभाष दुधाळ यांची ओळख होती. ते ४२ वर्षाचे होते. बुलडाणा जिल्ह्यात रायपूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार म्हणून त्यांची कारकीर्द उल्लेखनीय राहिली. रायपूर वरून बदली झाल्यावर त्यांच्यावर बुलडाणा सायबर क्राईम विभागाची देखील जबाबदारी होती. त्यावेळी त्यांच्या टीमने अनेक क्लिष्ट गुन्ह्यांची उकल केली होती.
  वर्षभरापूर्वी सुभाष दुधाळ यांची बीड येथे बदली झाली होती. नुकतीच बीड मधून त्यांची पुण्यातील सीआयडी विभागात बदली झाली होती. आता त्यांचा मृतदेहच आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. पुण्यातून ते परळीत कशासाठी आले होते हे कळू शकले नाही. सुभाष दुधाळ यांच्या मृतदेहाचे दोन तुकडे झालेले आहेत. दुधाळ यांच्या मृतदेहाशेजारी एक चिठ्ठी सापडली आहे, त्या चिठ्ठीत नेमके काय आहे हे अद्याप कळू शकले नाही.