खुनाने अंबाशी हादरले! धारदार शस्‍त्राने छाती, पोटात वार!!; चिखली तालुक्‍यातील थरारक घटना

 
murder
चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः धारदार शस्‍त्राने छातीत व पोटात वार करून ४० ते ५० वर्षे वयाच्या पुरुषाचा खून करण्यात आला. अंबाशी (ता. चिखली) येथे आज, ३ जानेवारी रोजी सकाळी अकराच्या सुमारास ही घटना समोर आली. खून झालेल्या व्यक्‍तीची ओळख अद्याप पटलेली नाही.

विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अंबाशी ते कोटोडा रस्त्यावरून शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना अंबाशी येथील प्रकाश देशमुख यांच्या शेतात अनोळखी पुरुषाचा मृतदेह दिसला. विद्यार्थ्यांनी शेतमालकाला माहिती दिली. चिखली पोलीस ठाण्याचे ठाणेदार अशोक लांडे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. छातीत, पोटात व मानेवर धारदार शस्‍त्राने वार करून खून झाल्याचे प्रथमदर्शनी समोर आले. चेहऱ्यावर दगडाने ठेचल्याचेही व्रण आहेत. तपासासाठी श्वानपथक आणि ठसे तज्‍ज्ञांनासुद्धा पाचारण करण्यात आले. मात्र ठोस काही पोलिसांच्या हाती लागले नाही. रात्री उशिरापर्यंत पोलीस मृतदेहाची ओळख पटविण्याचा प्रयत्न करत होते.