आईनेच पुसले मुलीच्या कपाळावरचे कुंकू! जावयाच्या डोळ्यात मिरची पावडर टाकली अन् बॅट तुटेपर्यंत हाणला; शेगाव तालुक्यातील घटना

 
Gfcnhg

शेगाव(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): लेकीचा संसार सुखाचा व्हावा म्हणून आई जीवाचे रान करते, तिच्या लग्नापासून तर लग्नानंतर देखील जावयाचा मानपान जपण्याचे काम सासू करते..मात्र एखादा जावई जर वैताग आणणारा निघाला तर..? शेगाव तालुक्यातील जवळा बु गावात एका आईनेच आपल्या लेकीच्या कपाळावरचे कुंकू पुसल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शेगाव ग्रामीण पोलिसांनी आरोपी सासुविरुद्ध गुन्हा दाखल केलाय. विशेष म्हणजे लेकीलाच याप्रकरणी आईच्या विरोधात खुनाची तक्रार द्यावी लागली.

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार घटना २२ फेब्रुवारीच्या संध्याकाळी ७ वाजेची आहे. दीपक गजानन हाडोळे (रा.शेगाव) असे मृतक जावयाचे नाव आहे. दीपक दारूच्या आहारी गेलेला होता, त्यामुळे त्याची पत्नी वैष्णवी(३०) ही माहेरी तिच्या आईकडे जवळा बु येथे राहत होती. त्यामुळे दीपक सासुरवाडीत येऊन अधूनमधून गोंधळ घालत होता. दिपक च्या दारूच्या व्यसनाला सारेच वैतागले होते.
    नेहमीप्रमाणे २२ फेब्रुवारीच्या संध्याकाळी दिपक दारू पिऊन सासुरवाडीत आला. सासू सुशीला काळे यांच्या घरासमोर दारू पिऊन शिवीगाळ करू लागला. सुशीला काळे यांनी घराचे गेट व कुलूप बंद केले होते, त्यावर दीपक ने मोठ्या दगडाने व विटांनी मारले. अखेर राग अनावर झाल्याने दिपकची सासू मागच्या दाराने घराबाहेर आली, दिपकच्या डोळ्यात मिरची पावडर टाकली आणि हातातील बॅट तुटेपर्यंत दिपकला बेदम मारहाण केली,या मारहाणीत दिपकचा मृत्यू झाला. दिपकच्या पत्नीने याप्रकरणी शेगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून आरोपी सासुविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.