दुधाच्या पिकअपने कारला धडक दिली; आई ठार,दीड वर्षांचा चिमुकला वाचला! वडील लेकीला सासरी घेऊन येत होते, मध्येच काळ आडवा आला! चिखली मेहकर रस्त्यावर झाला अपघात; दारूच्या नशेत होता उडवणारा..

 
ladies
चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): भरधाव व अनियंत्रित पीकअपने कारला धडक दिल्याने कारमध्ये बसलेल्या २२ वर्षीय विवाहितेचा जागीच मृत्यू झाला. चिखली मेहकर रस्त्यावरील आमखेड फाट्याजवळ काल,११ ऑक्टोबरला हा अपघात झाला. सौ. पुनम राहुल महाळणकर (२२, रा.एकलारा, ता.चिखली) असे अपघातात ठार झालेल्या विवाहितेचे नाव आहे.
 

पुनम आपल्या वडिलांकडे माहेरी परभणी जिल्ह्यातील सेलू येथे गेलेली होती. काल तिच्या वडिलांनी स्विफ्ट कार भाड्याने करून लेकीला सोडायला ते एकलारा येथे येत होते. मात्र एकलारा गाव अवघे दीड ते दोन किलोमीटर राहिले असताना चिखलीकडून येणाऱ्या एका दुधाच्या पीकअप वाहनाने कारला धडक दिली.
   

  या धडकेनंतर कारचा दरवाजा तुटल्याने कारमधील पूनम बाहेर फेकल्या गेली. डोक्याला व हाताला मार लागल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात पुनमचे वडील आणि कारचालक जखमी झाले आहेत. पुनम चा दीड वर्षाचा चिमुकला  चिकू सुखरूप बचावला. अपघातानंतर पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या पीकअप चालकाला स्थानिकांनी पकडुन ठेवले, यावेळी तो नशेत असल्याचे समोर आले. याप्रकरणी कारचालकाच्या तक्रारीवरून पीक अप चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक  करण्यात आली आहे. आरोपी नगर जिल्ह्यातील संगमनेर येथील आहे.