संपत्तीची हाव! बोगस करारनामा करून संपत्ती हडपण्याचा प्रयत्न; किनगावराजा येथील धक्कादायक प्रकार; आरोपींमध्ये पोलीस आणि वकिलांचा समावेश..
Aug 1, 2024, 09:57 IST
किनगावराजा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): हिंगोली जिल्ह्यातील पोलीस शिपाई पंडित तारे, बहीण भारती तारे, संगीता गुट्टेसह मराठवाड्यातील सात जणांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे खोटा करारनामा बनवून, खोट्या स्वाक्षरी करीत विदर्भातील किनगाव राजा येथील अश्विनकुमार सानप यांची संपत्ती हडपण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर केलेल्या तक्रारीनुसार किनगाव राजा पोलिसांनी चौकशीअंती सातही जणांविरुद्ध २५ जुलै रोजी विविध कलमांनुसार गुन्हे दाखल केले. यातील आरोपींमध्ये नोटरी करणारे वकील आणि एका मुद्रांक विक्रेत्याचाही समावेश आहे.
पोलीस शिपाई पंडित जगन्नाथ तारे, त्याची बहीण भारती तारे (वंजारवाडा, हिंगोली), दुसरी बहीण संगीता मुकुंद गुट्टे (परळी, जि. बीड), भानुदास मल्हारी ढाकणे (सोयंदेव माळ, ता.जि. जालना), बालाजी नारायणराव घाडगे (नरसी फाटा, हिंगोली), मुद्रांक विक्रेता उत्तम पुंडलीकराव सवडकर (हिंगोली) व नोटरी करणारे वकील ॲड. रामराव खंडोजी टोम्पे (बळीरामपूर, नांदेड) अशी आरोपींची नावे आहेत.
२४ जुलै २०२० ते १३-१२-२०२३ दरम्यानचा हा घटनाक्रम आहे. फिर्यादी अश्विनकुमार पंढरीनाथ सानप हे बोगस करारनामा प्रक्रियेत कुठेही हजर नसताना आरोपी भारती तारे (३८) हिने सानप यांच्या नावाने शंभर रुपयांचा स्टॅम्प पेपर बनावट सही करून खरेदी केला. तर पंडित तारे (३६) याने करारनाम्याचा प्रतिज्ञालेख लिहून झाल्यावर सानप यांची बोगस स्वाक्षरी त्यावर केली. तर नोटरी अधिकारी ॲड. रामराव टोम्पे यांनी अश्विन सानप उपस्थित नसताना हा स्टॅम्प नोटरी करून दिला. आरोपींनी जाणूनबुजून कट रचून फसवणूक करत अश्विन सानप यांची संपूर्ण संपत्ती हडप करण्याचा प्रयत्न केला. उत्तम सवडकर या स्टॅम्प विक्रेत्याकडून सानप यांच्या नावाने स्टॅम्प खरेदी केला होता. नांदेड येथे बनावट करारनामा तयार करून सानप यांच्या कुटुंबाच्या सर्व प्रॉपर्टीचे अधिकार भारती तारे हिने गट क्रमांक १६७, १६९, १७२, ५९८ मालमत्तेचे सर्व अधिकार स्वत:कडे लिहून घेतले होते.
असा झाला करारनाम्याचा 'कारनामा' उघड
अश्विन सानप यांनी शेत नांगरण्यासाठी पोलीस संरक्षणाची मागणी केली होती. मात्र भारती तारे हिने किनगाव राजा पोलीस ठाण्यात हाच बनावट करारनामा दाखवून त्या आधारे फिर्यादीस संरक्षण मिळू नये, अशी मागणी केली होती. त्यानंतर सानप यांनी माहिती अधिकार कायद्यांतर्गत १० ऑगस्ट २०२३ रोजी पोलीस अधीक्षक कार्यालयात पोलीस संरक्षणाकरिता सादर केलेल्या सर्व कागदपत्रांची माहिती मागितली. २९ ऑगस्ट २०२३ रोजी कागदपत्रे मिळाल्यानंतर आरोपींची बनवाबनवी समोर आली. षडयंत्र रचून संपत्ती लाटण्याचा डाव सानप यांनी उधळून लावल्यानंतर किनगाव राजा पोलीस ठाण्यात १३ डिसेंबर २०२३ रोजी तक्रार नोंदवली. पोलिसांनी चौकशी सुरू केल्यानंतर आरोपींचा पर्दाफाश झाला.चौकशीअंती सत्य बाहेर आल्यानंतर पोलिसांनी २५ जुलै २०२४ रोजी भादंवि कलम ४१९, ४२०, ४६४, ४६७, ४६८, ४७१, ३४ अन्वये गुन्हे दाखल केले. घटनेचा पुढील तपास ठाणेदार विनोद नरवडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी रमेश गोरे करीत आहे. दरम्यान, पोलीस आरोपींच्या मागावर गेले आहेत.
पोलीस शिपायावर विनयभंगाचा गुन्हा
घटनेतील मुख्य आरोपी पंडित तारे हा हिंगोली जिल्ह्यातील बासंबा पोलीस ठाण्यात पोलीस शिपाई म्हणून कार्यरत आहे. यापूर्वीही पंडित तारेविरुद्ध बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात सानप यांच्याच तक्रारीवरून १९ डिसेंबर २०२३ रोजी भादंवि कलम ३५४ अ, ५०४, ५०६, ५०७ नुसार गुन्हे दाखल आहेत.