नवरा बायकोचं भांडण सोडवायला गेले अन् घात झाला! पुतण्याने काकाचा जीव घेतला; आता भोगावी लागणार कर्माची फळे! जांभोरा येथील घटना...
Aug 17, 2024, 11:17 IST
सिंदखेडराजा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): प्रामाणिक उद्देशाने एखाद्यात मध्यस्थी करणेही कधीकधी अंगलट येते. सिंदखेड राजा तालुक्यातील जांभोरा येथील अनिल खरात यांच्या बाबतीतही तेच घडलं. पुतण्या त्याच्या बायकोसोबत भांडत होता, ते भांडण सोडवण्यासाठी अनिल खरात यांनी मध्यस्थी केली.मात्र रागाच्या भरात पुतण्या भारत खरात याने अनिल खरात यांच्या पोटात चाकूने सपासप वार केले, रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अनिल खरात यांना शेजाऱ्या पाजाऱ्यांनी रुग्णालयात नेले मात्र रक्तस्त्राव एवढा झाला होता की अनिल खरात यांचे प्राण वाचू शकले नाही...ही घटना आहे,२ एप्रिल २०१३ ची..आता काल,१६ ऑगस्ट रोजी याप्रकणात पुतण्या भारत खरात यांच्यावरील आरोप सिद्ध झालाय..न्यायालयाने त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
२ एप्रिल २०१३ रोजी सायंकाळी भारत खरात आणि त्याची पत्नी वंदना यांचे भांडण सुरू होते. भारत पत्नी वंदना हिला मारहाण करत होता. त्यावेळी शेजारी राहणारे भारतचे काका अनिल खरात धावत आले. वडिलकीच्या नात्याने त्यांनी भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला..मात्र भारत याने मागचापुढचा कुठलाही विचार न करता काकाच्या पोटात चाकूने सपासप वार केले. अनिल खरात यांच्या पत्नी इंदुबाई यांनी यावेळी एकच हंबरडा फोडला. उपचारासाठी नेत असतानाच अनिल खरात यांच्या मृत्यू झाला.
किनगाव राजा पोलीस ठाण्यात भारत खरात विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. प्रकरण न्यायालयात गेले. मेहकर येथील जिल्हा व सत्र न्यायालयात सुनावणी झाली. सरकारी पक्षाच्या वतीने ॲड. गजानन पोफळे यांनी बाजू मांडली. मृतक अनिल खरात यांची पत्नी, मुलगी यांच्यासह १२ साक्षीदार तपासले. अखेर भारत हाच आरोपी असल्याचे सिद्ध झाले आणि न्यायमूर्ती एस.के. मुंगीलवार यांनी काल,१६ ऑगस्ट रोजी भारत खरात याला जन्मठेप आणि सोबतच १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.