नवरा म्हणतो, तुला खायला चांगला चांगला माल लागतो; नणंद चुघल्या करते,म्हणते तुझा पायगुण चांगला नाही,तू पांढऱ्या पायाची..कारण..."तेच"..!लोणारच्या लेकीचा सिंदखेराजाच्या जागदरी गावात छळ मांडला!

 
Lonar
लोणार(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): हुंड्यामुळे अनेक लग्ने मोडल्याच्या घटना घडतात. लग्नानंतर सुद्धा काही जण माहेरवरून पैसे आण असा तगादा बायकोभोवती लावतात. त्यासाठी तिचा वाटेल तसा छळ करतात. तिला उपाशी ठेवतात, मारहाण करतात...तिच्याकडून जास्तीची कामेही करून घेतात..तिने सोसायचं तरी किती? अखेर कधीतरी त्याचा विस्फोट होतो अन् तिला नाईलाजाने पोलीस ठाण्याची पायरी चढण्याची वेळ येते. लोणारच्या भीमनगर परिसरात माहेरी राहणाऱ्या लेकिवर सुद्धा पोलीस ठाण्याची पायरी चढण्याची वेळ आली..कारण तेच...पैशांसाठी छळ!

लोणारच्या भीमनगर भागात राहणाऱ्या सपना चे लग्न सिंदखेड राजा तालुक्यातील जागदरी गावातील योगेश आश्रुबा भवाळ याच्याशी २०१६ मध्ये झाले होते.  लग्नात ३ लाखाची आंधन भांडी, सोन्याची एक तोळ्याची पोत, कानातील झूंबर व लग्नाला दोन लाख रुपयांचा खर्च अस सगळ काही सपनाच्या वडिलांनी थाटामाटात केलं. सुरुवातीचे एक वर्ष सपनाला सासरच्या लोकांनी चांगले वागवले मात्र नंतर पती दारू पिऊन सपनाला मारहाण करू लागला असे सपनाने तक्रारीत म्हटले आहे. तुला स्वयंपाक नीट येत नाही, तू शेतात कामाले जात नाही, तुला खायला चांगला चांगला माल लागतो असे टोमणे नवरा मारत होता, सपनाला त्याने अनेकदा घराबाहेर काढले असेही तक्रारीत म्हटले आहे.

   तुझा पायगुण चांगला नाही, लग्नात वऱ्हाडाला चांगले जेवण दिले नाही असे टोमणे सासू ,सासरे दिर मारत होते. सगळ्यांचे जेवण झाल्यावर सपनाला जेवण दिले जाऊ लागले, पुन्हा पुन्हा धुतलेले भांडे तिला धुवायला सांगत होते असेही तक्रारीत नमूद आहे. सपनाची नणंद जेव्हा जागदरी येथे यायची तेव्हा ती सपनाच्या चुगल्या करायची. हिला फारकती द्या,ही पांढऱ्या पायाची आहे..हिला उपाशी ठेवा असे तिची नणंद सपनाच्या सासू सासऱ्यांना सांगायची. सगळ्यांचे ऐकून पती सपनाचा आणखी छळ करीत होता. मोबाईल शॉपी चे दुकान टाकण्यासाठी माहेरवरून २ लाख रुपये आणण्याचा तगादा तिच्याभोवती लावण्यात येत होता असेही सपनाने तक्रारीत म्हटले आहे. 

सपनाचे वडील आजारी होते, त्यांना अर्धांगवायू चा झटका आलेला असल्याने पैसे देता येणार नाही असे सपना सांगत होती, मात्र सपनाच्या सासरची मंडळी ऐकायला तयार नव्हती. बापाच्या घरून पैसे आण नाहीतर फारकती घे, पैसे आणले तरच तुला नांदवू अशी भूमिका सपनाच्या सासरच्या लोकांनी घेतली. २१ डिसेंबर २०२१ ला तिला मारहाण केली आणि घराबाहेर हाकलले. तेव्हापासून सपना माहेरी राहते. मध्यस्थांनी समजूत घालण्याचा प्रयत्न करूनही सपनाचा नवरा ऐकायला तयार नाही. अखेर सपनाने लोणार पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून सपनाच्या पतीसह सासू,सासरा,दिर व नणंद अशा ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.