दोन महिन्यापूर्वी अपहरण झालेल्या बालिकेचा लागला शोध; चिखली पोलिसांनी आरोपीला संभाजीनगरातून उचलले!

 
बुलडाणा
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) दोन महिन्यांपूर्वी चिखली पोलीस स्टेशन हद्दीतील एका बालिकेचे अपहरण झाले होते. अपहरणकर्ता आरोपी फरार होता, त्याचा शोध घेवून ताब्यात घेण्याचे महत्त्वाचे आव्हान पोलिसांसमोर होते. दरम्यान, चिखली पोलीस ठाण्यातील अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षातील पथकाने संभाजीनगर येथून फरार आरोपीला ताब्यात घेतले आणि पीडित बालिकेची सुटका केली आहे.
सोहम रतन आव्हाड असे आरोपीचे नाव आहे. तो चिखली येथील सिद्धार्थ नगर भागातील रहिवासी आहे. दोन महिन्यांपूर्वी पीडित बालिकेचे त्याने अपहरण केले आणि फरार झाला. सदर गुन्ह्याची नोंद चिखली पोलीसांत करण्यात आली, तपास सुरू होता. यादरम्यान शुक्रवारी पोलिसांना माहिती मिळाली की, आरोपी सोहम आव्हाड तसेच पिडीता भोसरी पुणे येथे आहेत. त्यांनतर पोलिसांनी पुणे येथे जावून बघितले असता ते तिथे नव्हतेच, आरोपी पिडीतेसह संभाजीनगर येथे आहे अशी नवी माहिती मिळाली. अखेर संभाजीनगर येथील सिडको परिसरातील निसारवाडी भागात पिडीता आणि आरोपी मिळून आले. तेथून पोलिसांनी आरोपीला उचलले , पिडीतेला ताब्यात घेतले आणि चिखली पोलिसांच्या ताब्यात दिले. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सुनील कडासने, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, बीबी महामुनी, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक अशोक लांडे यांचे आदेशानुसार अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष पथकातील महिला पोलीस उपनिरीक्षक प्रिया उमाळे, पोलीस उपनिरीक्षक संजय ठाकरे, महिला पोलीस हवालदार सुमन घेवंदे, पोलीस नायक संभाजी आसोलकर, चालक पोलीस हवालदार सचिन शेंद्रे यांनी केली आहे.