एस टी बसचा समोरील काच फोडून प्रवाशांना बाहेर काढले! बस झाडांत अडकली नसती तर झाला असता अनर्थ;पहा दुधा घाटात एसटी बस कोसळल्यानंतरचा काळजाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ....

 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): धाड बुलडाणा रस्त्यावरील दुधा घाटात आज,६ ऑक्टोबरच्या सकाळी सव्वा सहा च्या सुमारास एसटी बस कोसळली. एम एच ४०, वाय ५४८१ क्रमांकाची मलकापूर आगाराची ही बस मलकापूरवरून छत्रपती संभाजीनगरकडे जात होती. दुधा घाटात अचानक ही बस कोसळली, सुदैवाने २० ते २० फुटांवर असलेल्या सागाच्या झाडात बस अडकल्याने बसमधील प्रवाशी वाचले.   
अपघात झाला त्यावेळी चालक आणि वाहक मिळून बसमध्ये १३ जण होते. त्यात ५ महिला प्रवाशी होत्या. पी टी गावंडे(३५, रा.मलकापूर) असे चालकाचे नाव असून राजेंद्र रामजी गीते(४५, रा.मलकापूर) असे वाहकाचे नाव आहे. अपघात व्हायच्या ५ मिनिटाआधी दुधा येथे एसटी महामंडळाच्या तपासणी पथकाकडून बसची तपासणी झाली होती. त्यानंतर तपासणी पथक धाडकडे जात असताना त्यांच्या समोरच हा अपघात झाला. त्याच वेळी बुलडाणा आगाराची दुसरी बस छत्रपती संभाजीनगरकडे जात होती. त्या बसमधील प्रवाशी व एसटी महामंडळाच्या तपासणी पथकाच्या कर्मचाऱ्यांनी अपघात ग्रस्त बस मधील प्रवाशांना एसटी बसचा समोरील काच फोडून बाहेर काढले. जीवाच्या आकांताने बसमधील प्रवाशी ओरडत होते. अपघातात बसच्या चालकासह ४ ते ५ प्रवाशी जखमी झाले आहेत.
म्हणून वाचले प्रवाशी..बस बुलडाण्याकडून धाड कडे जातांना उतारावरील वळणावर वळण न घेता घाटात शिरली. बस सरळ घाटात शिरल्यानंतर झाडांना धडकून पलटली. बसने एकच पलटी घेती आणि लगेच झाडांना अडकल्यामुळे बसमधील प्रवाशांचा जीव वाचला, बस झाडांना अडकली नसती तर मात्र अनर्थ घडला असता अशी चर्चा घटनास्थळी होती...