शेगाव तालुक्यातील आळसणा गावात 'जळक्यांचा कारनामा' सुरूच! दुचाक्या, वस्तू, शेतमाल पेटवून देण्याचा घटना थांबता थांबेना..

 
शेगाव
शेगाव(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) गेल्या अनेक दिवसांपासून शेगाव तालुक्यातील आळसणा गावात अज्ञात जळक्या लोकांचा कारनामा सुरूच असल्याचे दिसून आले आहे. जळावू वृत्तीच्या अज्ञतांनी याच परिसरातील कित्येक लोकांचा शेतमाल, वस्तू, गाड्या पेटवून दिल्या आहेत. तशा अनेक घटना उघडकीस आल्या आहेत. एका शेतातील मक्याची गंजी पेटवून दिल्याने १ लाख २५ हजाराचे नुकसान झाल्याची नवीन घटना २ मे रोजी घडली आहे.
यापूर्वी देखील या गावात दुचाक्या, गाड्या, वस्तू व शेतमाल पेटवून देण्याचे प्रकार घडले असून मागील महिन्यात एका कुटुंबातील ३ सदस्याच्या मोटारसायकली एकाच रात्री पेटवून दिल्या होत्या. तर त्याआधी गावात उभा असलेला १४ चक्की ट्रक पेटवला होता. तसेच शेतातील ऊस पेटवून देण्यात आला होता. तर वर्ष भरापासून अनेक दुचाक्या पेटवून देण्यात आलेल्या असून याबाबत पोलीस ठाण्यात तक्रारी देखील देण्यात आलेल्या आहेत. पेटवून देण्याच्या वेगवेगळ्या घटना या गावात घडलेल्या असतांना हे सत्र थांबता थांबेना. त्यामुळे पुन्हा एकदा आळसणा येथील शेतात असलेली मक्याची गंजी पेटवून दिल्याने या गावात जळक्यांचा कारनामा थांबणार तरी केव्हा ? असा प्रश्न गावकऱ्यांमध्ये निर्माण होत आहे. २ मे रोजीच्या प्रकरणात रविंद्र मनोहर
लांजुळकर वय ५८ वर्षे रा. आळसणा यांनी ग्रामीण पोलिसात तक्रार दिली की, २ मे रोजी मध्यरात्री आळसणा शिवारात शेख राजीक यांचे गट नं १६३ मध्ये साडेतीन एक्कर शेती दोन वर्षापासुन ठोक्याने केलेली आहे. त्या शेतामध्ये दिड एक्कर शेतात मक्का पेरलेला होता. अंदाजे १० ते १२ दिवसापूर्वी त्या शेतातील मक्का पिक धांड्यासह सोंगुन शेतामध्ये ठेवला होता. २ मे रोजी संध्याकाळी ७ वा ठोक्याने केलेल्या शेतातील मक्का पिक गावातील मजुर संजय सोनोने व इतर यांचेकडून उचलुन शेतामध्ये गंजी मारली होती. रात्री ९.३० वाजेपर्यंत मी शेतात थांबलो होतो. ३ मे रोजी रात्री १. ३० वा सुमारास
आळसणा येथील शेख शफीक शेख रहेमतउल्ला याने माझे मोबाइलवर कॉल करून कळविले की, तुमचे शेतातील मक्याचे गंजीचा धूर निघत आहे म्हणुन मी माझा मुलगा शुभम व शेख शफीक सह शेतामध्ये गेलो. शेतामध्ये आम्ही सर्वांनी पाहणी केली असता माझे ठोक्याने केलेल्या शेतातील मक्क्याची गंजी कोणीतरी अज्ञात इसमाने पेटवून दिलेली दिसली. तसेच मक्याची गंजी पुर्णपणे जळलेली होती. त्यामुळे माझा अंदाजे ५० क्विंटल मक्का व त्याचा कडबा असे अंदाजे १ लाख २५ हजार रुपयाचे नुकसान झालेले दिसले. सदर मक्कयाची गंजी खोडसाळ पणाने पेटवून दिलेली असुन तरी मक्का पेटवून देणा-या अज्ञात इसमाचा शोध घेवून कारवाई करण्यात यावी. अशा फिर्यादी वरून अज्ञात आरोपी विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.