शेतकऱ्याला चांगुलपणा अंगलट आला ; दोघांना लिफ्ट द्यायला गेले अन् वाईट घडलं.. ! पोलिसांनी दोघांना पकडले, मोताळा तालुक्यातील घटना..

 
Ghj
मोताळा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) खरबडी येथील दोघांना लिफ्ट देणे एका शेतकऱ्याला चांगलेच महागात पडले आहे. दोघांनी धमकी देत व चाकूचा दाख दाखवत पैसे हिसकावल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणाची पोलिसांना तक्रार प्राप्त होतात, अवघ्या काही वेळातच दोन्ही आरोपींच्या मुसक्या आवळल्या गेल्यात. 
याबाबत संजय पारस्कर(रा. भोटा ता नांदुरा) यांनी बोराखेडी पोलीस ठाण्यात रविवारी ३० एप्रिलला फिर्याद दिली. राजेश सोळंके, शेख मुनाफ(रा. खरबडी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. सविस्तर वृत्त असे की, संजय पारस्कर हे त्यांच्या गावाववरुन शिरवा येथे जाण्यासाठी निघाले होते. दरम्यान, खरबडी येथील चौकात चहा घेत असताना दोन अनोळखी तरुण त्यांना भेटले. तुम्हाला कुठे जायचे असे विचारले असता शिरवा येथे जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.आमच्या दोघांना सुद्धा शिरव्यालाच जायचे आहे त्यामुळे तुम्ही आम्हाला तुमच्या मोटरसायकलवर घ्या असे दोघे म्हणाले. त्यानंतर दोघांपैकी एकाने मोटरसायकल चालवायला घेतली.आणि एक जण मागे बसला होता.
तिघेजण शिरव्याच्या दिशेने निघाले. त्यांनतर बुलडाणा रोडवरील ग्रीनपार्क बार ऍण्ड रेस्टारंट जवळ त्याने गाडी थांबवली. आम्हाला पुड्या घेवुन द्या असे म्हणत ग्रीनपार्क बार ऍण्ड रेस्टारंट मध्ये नेवुन तेथे गेल्यावर दोघांनी दारुची मागणी केली होती. त्यावेळी संजय पारस्कर यांनी दोघांना नकार दिला. दुचाकी चालवणाऱ्या तरुणाने दुचाकी परड्या फाट्यासमोर घेतल्याने परडा मार्गे शिरवा घ्या असे ते म्हटले. परंतु पाठीमागे बसलेल्या तरुणाने फिर्यादी संजय यांच्या पोटाला चाकु लावुन "तु आरडाओरड केल्यास तुला मारुन टाकु" अशी धमकी दिली. त्यानंतर दुचाकी खामखेड गावाचे समोर राहेरा रस्त्यावर दोघांनी लावली आणि खिशात हात टाकून , चाकूचा धाक दाखवत बारा हजार हिसकावून घेतले व दोघे तेथून निघून गेले. त्यानंतर संजय पारस्कर यांनी दुचाकी घेतली आणि पोलीस स्टेशन गाठले. पोलिसांना सगळी हकीकत सांगितली, त्यानंतर पोलिसांनी त्यांना सोबत घेत ग्रीन पार्क बार येथे गेले. त्याठिकाणी सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. पोलिसांनी तपास सुरू केला आणि काही वेळाने पोलीस हेड कॉन्स्टेबल नंदकिशोर धांडे, प्रविण पडोळ, विनोद नरोटे यांनी दोघा आरोपींना ओळखुन त्यांच्या घरून ताब्यात घेतले. पोलीस स्टेशनला आणले असता फिर्यादी संजय पारस्कर यांनी दोन्ही आरोपीला ओळखले, त्यानंतर दिलेल्या तक्रारीवरून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.