सासऱ्याची वाईट नजर, पती-पत्नीला झोपले की फटीतून पहायचा, ती झोपल्यावर तिच्याजवळ जाऊन बसायचा; मेहकरच्या लेकीने घेतला गळफास!

 
आत्महत्या
मेहकर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जून २०२० मध्ये तिचे लग्न झाले. लग्नानंतर महिनाभरातच छळ सुरू झाला. सासऱ्याची नजर वाईट असल्याचे तिला कळले. तिने आई- वडिलांना सांगितले. मात्र येतील तुझे सुखाचे दिवस... असे म्हणत आई- वडिलांनी सध्या शांत राहण्याचा सल्ला दिला. अधूनमधून माहेरी आल्यावर सासऱ्याचे अन्‌ सासरचे कारनामे सांगायची. आता पुन्हा तिकडे गेले तर जीवच द्यावा लागेल, असे ती आईला सांगायची. मात्र आई- वडील तिची समजूत काढत तिला सासरी पाठवायचे. अखेर त्रास असह्य झाला आणि तिने गळफास घेऊन कायमचा जगाचा निरोप घेतला. मुलगी गमावल्यानंतर काल, ९ जानेवारीला मुलीच्या आईने वाशिम ग्रामीण पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी तक्रारीवरून वाशिम जिल्ह्यातील धारकाटा येथील तिच्या पतीसह सासू, सासऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

सौ. मीना जनार्धन शिंदे (रा. नांद्रा धांडे, ता. मेहकर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांची मुलगी जयश्रीचा (२१) विवाह २४ जून २०२० ला वाशिम जिल्ह्यातील धारकाटा येथील लखन मंडळकर याच्याशी झाला होता. जयश्रीचे शिक्षण १० वीपर्यंत झाले होते. लग्नानंतर अवघ्या महिनाभरातच हुंडा कमी मिळाला म्हणून सासू, सासरे व पती तिला टोचून बोलू लागले. जयश्रीने आई- वडिलांना याबद्दल सांगितले व नंतर ती आई-वडिलांसोबत  माहेरी नांद्रा धांडे येथे आली. काही दिवसांनंतर जयश्रीची समजूत काढून तिला पुन्हा माहेरी पाठवण्यात आले. मात्र नंतर सासऱ्याची वाईट नजर जयश्रीवर पडली. जयश्री व तिचा पती खोलीत झोपलेले असताना फटीतून पाहत होता. जयश्री एकटी पलगांवर झोपलेली असताना सासरा गुपचूप तिच्याजवळ जाऊन बसायचा, असे जयश्रीच्या आईने तक्रारीत म्हटले आहे.

जयश्री गरोदर राहिल्यानंतर सासरचे लोक तिला दवाखान्यात नेत नव्हते. त्यामुळे जयश्रीच्या वडिलांनी उपचारासाठी तिला मेहकर येथे आणले. डॉक्टरांनी गर्भ खराब झाला, असे सांगितल्याने गर्भ काढून टाकावा लागला. माहेरी आल्यावर तिने सासरच्या वाईट कृत्याबद्दल आईला सांगितले होते. त्यामुळे मी आता सासरी जात नाही, असे जयश्री म्हणत होती. मात्र जयश्रीचा पती तिला घ्यायला आल्यावर तिची समजूत काढून पुन्हा तिला सासरी पाठवले होते. लग्न होऊन दीड वर्ष झाले तरी मूलबाळ का नाही, असे म्हणत सासू- सासरे मारहाण करत टोचून बोलू लागले.

जयश्रीने पुन्हा वडिलांना याबद्दल सांगितले. जयश्रीच्या वडिलांनी तिला २०२१ च्या दिवाळीसाठी माहेरी आले. ती आता सासरी जायला तयारच नव्हती. आता गेले तर जीवच द्यावा लागेल, असे ती आई- वडिलांना सांगत होती तेव्हा एखादे मूल झाल्यावर त्रास कमी होईल, असे म्हणून तिची समजूत काढण्यात येत होती. ७ नोव्हेंबर २०२१ ला जयश्रीचा पती तिला न्यायला सासरवाडीत आला व तिला घेऊन गेला. त्यानंतर दीड महिन्याने १९ डिसेंबर २०२१ रोजी दुपारी बाराच्या सुमारास जयश्रीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. काल, ९ जानेवारी रोजी मुलीच्या  मृत्यूच्या दुःखातून सावरत जयश्रीच्या आईने तक्रार दिली. तक्रारीवरून वाशिम ग्रामीण पोलिसांनी जयश्रीचा पती लखन सुभाष मंडळकर, सासरा सुभाष गंगाराम मंडळकर व सासू तान्हाबाई गंगाराम मंडळकर (तिघे रा. धारकाटा, जि. वाशिम) यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.