Amazon Ad

अवैध दारू विक्री विरोधात अख्खे गाव एकवटले! दहा दिवसात न्याय द्या, अन्यथा तीव्र आंदोलन.. मेहकर तालुक्यातील जवळा ग्रामस्थांचा इशारा

 
मेहकर (अनिल मंजुळकर : बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) मेहकर तालुक्यातील जवळा येथे सुरू असलेल्या अवैध दारू विक्री विरोधात अख्खे गाव एकवटले. गावात सुरू असलेल्या विना परवाना दारू विक्री दुकानांवर कारवाई करून बंद करण्याची मागणी ग्रामस्थांनी आज ९ जुलै रोजी केली. याबाबत डोणगावच्या ठाणेदारांना निवेदन सुपूर्द केले. 
  डोणगाव पोलीस स्टेशन हद्दीतील जवळा गावात विनापरवाना दारू विक्रीची दुकाने थाटली आहे. दारूमुळे गावातील अनेकांचे संसार उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. गावातील सामाजिक एकोपा बिघडत असून १५ ते ३० वयोगटातील तरुण व्यसनाच्या आहारी जात आहे. यामुळे महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न देखील ऐरणीवर आला आहे. खुलेआम व्यसनी तरुणांची दादागिरी वाढत चालली आहे. गावातील सामाजिक कार्यात अडथळा निर्माण होत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. पुढील दहा दिवसात संबंधित विभागाने अवैध दारू विक्री दुकानांवर कारवाई करावी, अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येणार असल्याचा समस्त जवळा ग्रामस्थांनी दिला आहे.