दारूडा नवरा रोज छळायचा! तिने वैतागून उंदीर मारण्याचे औषध घेऊन संपवले जीवन; आता दारुड्या नवऱ्याला न्यायालयाने घडवली अद्दल! वळती येथे घडली होती घटना...

 
court

 बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): वारंवार शारीरिक व मानसिक छळ करून पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या वळती येथील दारूड्या नवऱ्याला येथील जिल्हा व सत्र न्यायालया (२) चे न्यायाधीश एस. बी. डिगे यांनी पाच वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. सहा वर्षांनंतर या खटल्याचा निकाल लागला.

चिखली तालुक्यातील वळती येथील आरोपी सुभाष ज्ञानदेव उगले हा पत्नी लक्ष्मीला लग्न झाल्यापासूनच त्रास देत होता. दारू पिवून मारझोड करत होता. तसचे अश्लील शिवीगाळ करून मानसिक त्रास द्यायचा. लक्ष्मीचा दीर आरोपी उमेश उगले हा देखील तिचा दारू पिवून शारीरिक व मानसिक छळ करीत होता.

दोन्ही आरोपी २५ ऑगस्ट २०१८ रोजी दारू पिवून घरी आले. सुभाष उगले हा दोन मुली व मुलास मारहाण करू लागला. लक्ष्मीने अडवले असता आरोपीने तिला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच अश्लील शिवीगाळ केली. नेहमीच्या त्रासाला कंटाळून लक्ष्मीने घरातील उंदीर मारण्याचे औषध प्राशन केले. तिला चिखली येथील खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना २८ ऑगस्ट रोजी तिचा मृत्यू झाला.

खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना पोलिसांनी लक्ष्मीची मृत्यूपूर्व जबानी घेतली. त्यात तिने नवऱ्याच्या नेहमीच्या त्रासाला कंटाळून उंदीर मारण्याचे औषध घेतल्याचे सांगितले. लक्ष्मीची आई सुनीता सवडतकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून चिखली पोलिसांनी आरोपी पतीसह दीराविरुद्ध भादंवि कलम ३०६, ४९८ अ, ३४ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आला होता. चौकशीअंती पोलिसांनी येथील न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सरकारी पक्षातर्फे सहायक सरकारी वकील ॲड आशिष केसाळे यांनी काम पाहिले. कोर्ट पैरवी म्हणून पोलीस शिपाई नंदाराम इंगळे यांनी मदत केली. 

लक्ष्मीच्या मृत्यूपूर्व जबानीने आरोपीला शिक्षा

हा खटला जिल्हा व सत्र न्यायालयात (२) सुरू झाला. सरकारी पक्षाच्या वतीने नऊ साक्षीदार तपासण्यात आले. मृत लक्ष्मीची मृत्यूपूर्व जबानी व तिच्या आईची तसेच शेजाऱ्यांची साक्ष महत्त्वाची ठरली. दोन्ही बाजूंचा युक्तीवाद झाल्यानंतर न्यायाधीश एस. बी. डिगे यांनी आरोपी सुभाष उगले यास दोषी ठरवून ३०६ कलमांतर्गत पाच वर्षे सश्रम कारावास व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. तसेच भादंवि कलम ४९८ अ अंतर्गत एक वर्ष सश्रम कारावास व एक हजार रुपये दंड असा निर्णय दिला.