जिल्हा पुन्हा हादरला! एकाच दिवसात ३ खून; असोल्यानंतर संग्रामपूरात दुहेरी हत्याकांड! सासऱ्याने गर्भवती सुनेला अन् नातवाला संपवले...

 
संग्रामपूर(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): जिल्ह्यात आज सकाळीच चिखली तालुक्यातील असोला शिवारात तरुणीचा जाळून खून केल्याची घटना घडली होती. त्या घटनेचे धागेदोरे शोधण्यात पोलीस व्यस्त असतानाच संग्रामपूरात दुहेरी हत्याकांडाची घटना घडली आहे. सासऱ्याने गर्भवती सून व १० वर्षीय नातवाची कुऱ्हाडीने सपासप वार करून हत्या केली आहे. पोलिसांनी आरोपी सासऱ्याला अटक केली आहे. नारायण गायकी(६५) असे मारेकऱ्याचे नाव आहे.आश्विनी गणेश गायकी(३०) आणि समर्थ देवानंद गायकी(१०) अशी मृतकांची नावे आहेत. 
 प्राप्त माहितीनुसार आरोपी नारायण गायकी हा दारूच्या व्यसनाच्या आहारी गेलेला आहे. आज,२३ जानेवारीला दुपारी देवानंद गायकी यांचा मुलगा समर्थ हा शाळेतून घरी आला. त्यावेळी घरघुती वादाचा राग मनात ठेवत आरोपी नारायण गायकी याने समर्थच्या तोंडावर कुऱ्हाडीने वार केले. या घटनेत त्याचा जागीच मृत्यू झाला.
सदर प्रकार पाहून समर्थची आई आरडाओरड करत घराबाहेर पळत गेली. मात्र नारायण गायकी याची लहान सून ८ महिन्यांची गर्भवती असल्याचे तिला पळता आले नाही, सासऱ्याने काही विचार न करता लहान सून आश्विनीच्या अंगावर देखील कुऱ्हाडीने सपासप वार केले. गंभीर जखमी अवस्थेत तिला उपचारासाठी दवाखान्यात नेण्यात आले मात्र वाटेतच तिचा मृत्यू झाला.
"त्या" बिचाऱ्याचा काय दोष..?
या घटनेत दोघांचा खून झाल्याचे दिसत असले तरी आश्विनीच्या पोटातील ९ महिन्यांच्या अर्भकाचा देखील आईच्या पोटातच मृत्यू झाला. जग पाहण्याच्या आधीच आजोबाने त्याला जगातून उठवले. या घटनेमुळे एकच हळहळ व्यक्त होत आहे. 
सासऱ्याला अटक..
घटनेचे गांभीर्य लक्षात येताच तामगाव पोलिसांसह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. आरोपी सासऱ्याला पोलिसांनी अटक केली असून त्याच्याविरोधात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे.