पोटचा पोरगाच निघाला सैतान; संपत्तीसाठी मित्राच्या मदतीने बापाला यमसदनी पाठवले, नदीपात्रात फेकले; "असा" लागला तपास! संग्रामपूर तालुक्यातील घटना
Jul 23, 2024, 07:08 IST
संग्रामपूर(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): संपत्तीच्या वादातून पोटच्या पोराने बापाचा जीव घेतल्याचा धक्कादायक प्रकार संग्रामपूर तालुक्यात समोर आला आहे. बापाचा खून करण्यासाठी पोराने मित्राची देखील मदत घेतल्याचे पोलीस तपासात उघड झाले. तामगाव पोलीस स्टेशन हद्दीतील ही संतापजनक घटना आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले आहे.
प्राप्त माहितीनुसार एका आठवड्यापूर्वी संग्रामपूर तालुक्यातील काटेल आणि वडगावदरम्यान वान नदीपात्रात एक अनोळखी मृतदेह आढळला होता. मृतदेह कुजलेल्या अवस्थेतील असल्याने ओळख पटत नव्हती. पोलिसांनी पंचनामा केला असता प्रेताच्या अंगावर असलेल्या मळकट कलरच्या शर्टवरील कॉलर वर इंग्रजीत कुळे टेलर दानापुर असे लिहिलेले होते.
दरम्यान पोलिसांनी कुजलेल्या त्या मृतदेहाचे जागीच शवविच्छेदन करून अंतिम संस्कार केले. त्यानंतर पोलिसांनी शेजारच्या अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील दानापुर हे गाव गाठले. गावातील कुळे टेलर चा शोध घेतला. टेलरला सदर मृतदेहाचे फोटो, अंगावरील शर्टचा फोटो दाखवला. त्यावेळी हे आमच्याच गावातील अशोक विष्णू मिसाळ असल्याचे टेलर ने पोलिसांना सांगितले.
खून केल्याचे उघड...
दरम्यान या माहितीनंतर पोलिसांनी अशोक विष्णू मिसाळ याचे घर गाठले. चौकशी केली असता अशोक विष्णू मिसाळ आठवड्या भरापासून गायब असल्याचे सांगण्यात आले. पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवत तपास प्रारंभ केल्यावर मात्र या प्रकरणातील धक्कादायक कारण समोर आले. १३ जुलै रोजी मृतक अशोक मिसाळ यांचा जळगाव जामोद येथे राहणारा मुलगा प्रवीण उर्फ शुभम मिसाळ हा भेटीसाठी दानापुर येथे आला होता. रात्रभर वडिलांसोबत राहल्यानंतर दुसऱ्या दिवशी तो परस्पर कुणाला न सांगता निघून गेला. त्या दिवसापासून अशोक मिसाळ गायब असल्याचे तपासात समोर आले.
अशोक मिसाळ हे पत्नी व मुलापासून मागील २० वर्षांपासून वेगळे राहत होते. त्यांच्या नावावरील जमीन मुलाच्या नावावर न करता परस्पर विक्री करत होते. यामुळे मुलगा प्रवीण आणि अशोक मिसाळ यांच्यात सातत्याने वाद होत होते असेही तपासात समोर आले. पोलिसांनी मुलगा प्रवीणचा मोबाईल नंबर मिळवून आधी तांत्रिक पुरावे गोळा केले, त्यात तो १३ जुलैच्या दुपारपासून रात्रीपर्यंत दानापुर येथेच असल्याचे उघड झाले. त्या दिवशी त्याचे वडिलांशी वाद झाल्याचेही समोर आले.
दरम्यान सर्व पुरावे प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी अत्यंत शिताफीने जामोद येथून प्रवीण मिसाळ याला ताब्यात घेतले. आधी तो मी नव्हेच असेच प्रवीण सांगत होता मात्र पोलिसांनी हिसका दाखवताच तो वठणीवर आला आणि त्याने गुन्ह्याची कबुली दिली. जामोद येथील त्याचा मित्र राहुल रामदास दाते (२५) याच्या मदतीने वडील अशोक मिसाळ यांचा गळा आवळून खून केला. त्यानंतर मोटरसायकलवर तो मृतदेह आणून काटेल हद्दीतील वान नदीपात्रात पुरावा नष्ट करण्यासाठी दगड , गोट्यांनी पुरण्याचा प्रयत्न केल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. त्यानंतर पोलिसांनी प्रवीणचा साथीदार राहुल दाते यालाही अटक केली असून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.