कुरिअर कर्मचारी नाश्ता करायला खाली उतरला अन् ६० लाख रुपयांची कॅश गायब! निष्काळजी पणा महागात पडला..
Feb 10, 2024, 20:52 IST
नांदुरा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): कुरियर सर्विस चा कर्मचारी खाजगी ट्रॅव्हलमधून पैसे घेऊन जात असताना ६० लाखांची रोकड असलेली बॅग अज्ञात चोरट्यांनी काही मिनिटातच 'गायब' केली!. ९ फेब्रुवारी च्या रात्री उशिरा राष्ट्रीय महामार्ग क्रं ५३ वरील वडनेर (भोलजी) नजीकच्या हॉटेल विश्वगंगा येथे ही घटना घडली.
कुरियर सर्विस चे काम करणारे प्रमोद मोहनसिंह परमार (वय 30 हल्ली मुक्काम लक्ष्मी विहार अपार्टमेंट, अकोला) यांनी नांदुरा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यात म्हटले आहे की, की ते रमेश कुमार अंबालाल कंपनी मुंबई यांच्या अकोला येथील शाखेमध्ये शाखा मॅनेजर विक्रमसिंग स्वरूपसिंग मांगलियार यांच्या हाताखाली कुरियर सर्विस चे काम करतात. माझ्याकडे कंपनीची रोख रक्कम घेऊन जाण्याचे काम असून दर पाच ते सहा दिवसांनी वेगवेगळ्या जिल्ह्यात कॅश घेऊन जात असतो. ९ फेब्रुवारी रोजी अकोला वरून जीपीएस मशीन लावलेल्या काळ्या रंगाच्या बॅगेत ६०,०००,०० रुपये ठेवून आर संगीतम ट्रॅव्हल्स ने निघालो. रात्री ९.३० वाजेला हॉटेल विश्वगंगा येथे रोख रक्कम असलेली बॅग सीटवर ठेवून गाडीच्या खाली उतरलो. नाश्ता करीत बसलो असता अज्ञात चोरट्याने बॅग मधून ६० लाख रुपये चोरले. एक किलोमीटर अंतरावर बॅगेतील रोख रक्कम काढून जीपीएस मशीनसह बॅग फेकून देत आरोपी पसार झाला असे तक्रारीत म्हटले आहे. तपास सपोनी नागेश जायले करीत आहेत.