Amazon Ad

अवैध रेतीवाल्यांची हिम्मत वाढली; मेहकरच्या तहसीलदारांवर पाळत ठेवली, शासकीय निवासस्थानासमोर मारायचा चकरा; तहसीलदारांचा गेम करण्याचा प्रयत्न? आधी रेतीमाफियांना पोसले तेच आता जीवावर बेतले...

 
मेहकर(अनिल मंजुळकर:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): जिल्ह्यात अवैध रेतीमाफियांनी धुमाकूळ घातलाय..आधीच महसूल प्रशासनाच्या आशीर्वादाने हा खेळ चालत असल्याने आता रेतीवाले महसूल प्रशासनाच्या डोक्यावर बसल्याचे चित्र आहे..ते कुणाच्याच बापाला जुमानत नाहीत, छोट्या मोठ्या कारवायांनी त्यांना काही फरक पडत नाही..अवैध रेतीवाले प्रसंगी आडव्या येणाऱ्या अधिकाऱ्याचा बळी घ्यायलाही मागे पुढे पाहणार नाहीत असे चित्र आहे..त्याचा प्रत्यय काल पुन्हा एकदा मेहकरात आला.. मेहकरच्या दिव्यांग तहसीलदारावर पाळत ठेवण्यात आल्याचा प्रकार समोर आलाय..याप्रकरणी तहसीलदारांच्या तक्रारीवरून तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय..तिघेही आरोपी अवैध रेतीवाहतूकीशी संबधित आहेत. गजानन मनोहर इंगळे,योगेश राजेंद्र काटकर आणि मोहन राजेंद्र काटकर तिघेही रा.मेहकर अशी आरोपींची नावे आहेत.

 प्राप्त माहितीनुसार तहसीलदार  निलेश मडके मागील दोन आठवड्यापासून अवैध रेती वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करीत आहेत. काही टिप्पर विरुद्ध कारवाई करून त्यांना दंड आकारून ती वाहने मेहकरच्या पोलीस ठाण्यात लावली आहेत. दरम्यान यामुळे पित्त खवळलेल्या रेतीमाफियांकडून तहसीलदारांना अडचणीत आणण्याचा किंवा त्यांचा गेम करण्याचा प्रयत्न सुरू आहे. काल, २५ मे रोजी सकाळी १० च्या सुमारास तहसीलदार मडके यांच्या फोनवर एका अनोळखी व्यक्तीचा फोन आला , तुमच्या घरासमोर एक जण चकरा मारत असल्याचे त्या फोन करणाऱ्याने सांगितले. तहसीलदार मडके यांनी घरासमोर येऊन पहिले असता एक जण पाळत ठेवून असल्याचे तहसीलदार मडके यांच्या लक्षात आले. संबधित व्यक्ती हा नेहमीच पाठलाग करत असल्याचे लक्षात आल्याने तहसीलदारांनी त्याला हटकले, तू इथे काय करतोय, माझा पाठलाग का करतोय असे तहसीलदारांनी विचारले असता तुम्ही आमच्या गाड्या पोलीस स्टेशनला का लावल्या असे म्हणत तहसीलदार मडके यांच्याशी हुज्जत घातली. योगेश काटकर आणि मोहन काटकर यांच्या सांगण्यावरून पाठलाग करत असल्याचेही त्याने सांगितले. तहसीलदार घरात जात असताना आरोपीने तहसीलदारांना अटकाव केला अशी तक्रार तहसीलदार निलेश मडके यांनी पोलीस ठाण्यात दिली आहे.