शुल्लक कारणाचा वाद प्रकोपाला! लोखंडी रॉडने शेतकऱ्याचे डोके फोडले, जिवे मारण्याची दिली धमकी! नांदुरा तालुक्यातील घटना.

 
नांदुरा
नांदुरा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): नांदुरा तालुक्यातील फुली शिवारात शेतीच्या धुऱ्यावरुन मोठा वाद झाला. धुऱ्यावर कचरा का टाकला असे म्हणून एकाने वादंग सुरू केला. त्यांनतर वाद इतका प्रकोपाला गेला, की लाकडी काठ्या,लोखंडी रॉडने मारहाण करण्यात आली. यासंदर्भात शेतकरी धनंजय सुपे यांनी बोरखेडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार २८ जानेवारीला चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटना २५ जानेवारी रोजी घडली. सकाळी ९ वाजेच्या जवळपास धनंजय सुपे त्यांच्या पत्नीसह शेतकामासाठी फुली शिवारातील त्यांच्या शेतात आले, त्यांच्या सोबतीला कामावर असणारे गजानन खोंदले सुद्धा होते. त्यावेळी बाजूच्या शेतातील रितेश वावगे याने धुर्‍यावर कचरा का टाकला असे म्हणून शिवीगाळ केली. तसेच लोटपाट करून वादाला सुरुवात केली. मात्र सुपे यांची पत्नी तसेच गजानन खोंदले यांच्या मध्यस्थीने वाद मिटला. त्यानंतर दुपारी १२ वाजता रितेश वावगे तिघे जण घेऊन आला. व धुर्‍यावर कचरा का टाकता असं म्हणत परत त्याने शिवीगाळ करायला सुरुवात केली. लाकडी काठी घेऊन त्याने सुपे यांच्या हातावर वार केला. त्यांची पत्नी व गजानन खोदले वाद सोडवण्यासाठी आले असता शुभम वावगे, आणि सागर राऊत या दोघांनी त्यांना लोटपाट केली.तिकडे रितेशच्या सोबतीला असणारे गजानन दांडगेने सुपे यांच्या डोक्यावर लोखंडी रॉडने मारहाण केली. त्यावेळी त्यांना शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी सुद्धा देण्यात आली. मारहाणीत धनंजय सुपे, व त्यांची पत्नी तसेच गजानन खोंदले जखमी झाले. उपचारासाठी तिघे बुलढाण्यातील खाजगी दवाखान्यात दाखल होते. प्रकृती ठीक झाल्यानंतर धनंजय सुपे मोताळ्यात आले. त्यानंतर बाराखडी पोलीस ठाण्यात त्यांनी तक्रार दिली. त्यानुसार रितेश वावगे, शुभम वावगे, (रा फुली ता.नांदुरा), सागर राऊत (रा. उमाळी), गजानन दांडगे (रा. वडगाव ता. मलकापूर) यांच्याविरुद्ध २८ जानेवारीला गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास हेड कॉन्स्टेबल सुपडसिंग चव्हाण करत आहेत.