कंडक्टर म्हणाले, चिखली आली उतरा उतरा! पण तो उतरलाच नाही; कोलाऱ्याच्या तुकारामचा दुर्दैवी अंत; पुण्यातून बसला होता
Mar 29, 2023, 17:45 IST

चिखली( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): पुण्यातून चिखलीला येण्यासाठी एसटी बस मध्ये बसलेला तुकाराम चिखलीच्या बस स्टँड वर उतरलाच नाही. त्यामुळे एसटी बस थेट चिखलीच्या उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आली. तिथे डॉक्टरांनी तुकारामला मृत घोषित केले. काल, २८ मार्चच्या रात्री साडेनऊच्या सुमारास चिखली बसस्थानकावर हा प्रकार उघडकीस आला. तुकाराम सोळंकी (३८, रा. कोलारा,ता.चिखली) असे मृतकाचे नाव आहे.
तुकाराम काल सकाळी पुण्यातून चिखलीला येण्यासाठी पुणे अकोला या एसटी बस मध्ये बसला होता. तो आजारी असल्याने दवाखान्यातून त्याला सुट्टी झालेली होती. रात्री साडेनऊला एसटी बस चिखली बस स्थानकावर आली. वाहकाने चिखलीच्या प्रवाशांना उतरायला सांगितले मात्र शेवटच्या सीट वर बसलेला तुकाराम काही उतरला नाही. तो झोपला असेल असे वाटल्याने वाहक त्याला उठवायला गेले मात्र त्याच्याकडून कोणताच प्रतिसाद येत नव्हता. अखेर चालक व वाहकाने बस थेट शासकीय रुग्णालयात हलवली. तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित होते. तुकारामच्या मृत्यूचे नेमके कारण समोर येऊ शकले नाही. चिखली पोलिसांनी याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.