पोलीस कर्मचाऱ्याकडून आमदार संजय गायकवाडांची गाडी धुण्याचे प्रकरण तापले! एसपी कडासने म्हणाले, चौकशी करून कारवाई करू....

 
Police
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): आमदार संजय गायकवाड यांची गाडी धुत असल्याचा एका पोलीस कर्मचाऱ्याचा व्हिडिओ समोर समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. पोलीस प्रशासनाची प्रतिमा मलिन करणारा हा प्रकार असल्याच्या शेकडो प्रतिक्रिया वाचकांनी बुलडाणा लाइव्ह कडे पोहचवल्या. दरम्यान यावर बुलडाणा लाइव्ह ने एसपी सुनील कडासने यांच्याशी संपर्क साधला असता चौकशी करून कारवाई करणार असल्याचे सांगितले.
आमदार संजय गायकवाड यांना शासनाने वाय दर्जाची सुरक्षा पुरवली आहे. शिवाय आमदार या नात्याने त्यांना अंगरक्षक देखील पुरवण्यात आले आहेत. पोलिसांची जबाबदारी त्यांची सुरक्षा करण्याची आहे. मात्र आमदार गायकवाड यांच्या सुरक्षारक्षकांपैकी एकाने आमदार गायकवाड यांची गाडी धुतली. विशेष म्हणजे हे करीत असताना अंगावर खाकी वर्दी आणि कमरेला रिव्हॉलवर देखील आहे. तो व्हिडिओ माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी फेसबुक वर पोस्ट केला. तुमचे काम आया बहिणींची सुरक्षा करणे आहे की आमदारांची गाडी धुण्याचे असा हर्षवर्धन सपकाळ यांनी केला. दरम्यान आता पोलीस प्रशासनाकडून यावर कठोर कारवाई होण्याचे संकेत मिळत आहेत. तो पोलीस कर्मचारी कोण याची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात येईल असे एसपी सुनील कडासने बुलडाणा लाइव्ह शी बोलतांना म्हणाले.