झाडावर लटकलेला तरुणाचा मृतदेह आढळला!; खामगाव तालुक्यात खळबळ

 
DEATH
खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत काल, २ जानेवारी रोजी खामगाव तालुक्यातील नागझरी बुद्रूक शिवारात आढळला होता. त्याची ओळख पटली असून, मृतदेह अमडापूर येथील आकाश सुरेश गवई (२५) याचा असल्याचे समोर आले आहे. ७-८ दिवसांपासून तो घरातून बेपत्ता होता.

पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, काल सकाळी १०  च्या सुमारास नागझरी बुद्रूक शिवारातील पाझर तलावावर गुरांना पाणी पाजण्यासाठी गेलेल्या गुराख्याला कुजलेला मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत दिसून आला होता. त्याने वैरागड पोलीस पाटलांना याबद्दल माहिती दिली. हिवरखेड पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. हिवरखेड पोलीस ठाण्यात याप्रकरणी अनोळखी मृतदेह आढळल्याची नोंद करण्यात आली.

या प्रकरणाचे गूढ उकलण्यासाठी पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. मृतदेहाच्या खिशात एक ओलसर आधार कार्डची झेरॉक्स सापडली. याशिवाय एका डीजे मालकाचे व्हिजिटिंग कार्ड सापडले. पोलिसांनी त्या नंबरवर फोन करून चौकशी केली असता मृतदेह अमडापूर (ता. चिखली) येथील आकाश सुरेश गवई या तरुणाचा असल्याचे समोर आले. आकाश ७-८ दिवसांपासून घरून फरार होता.

मात्र तो ड्रायव्हर असल्याने कुठेतरी गेला असेल, परत येईलच असे घरच्यांना वाटल्याने पोलिसांत तक्रार देण्यात आली नव्हती. अखेर त्याचा मृतदेहच सापडल्याने त्याच्या कुटुंबियांवर मोठे दुःख कोसळले आहे. आकाश अमडापुरातून नागझरी बुद्रूकच्या जंगलात कसा गेला? ही हत्या आहे की आत्महत्या? याचा तपास हिवरखेड पोलीस ठाण्याचे पोहेकाँ लालसिंग चव्हाण करीत आहेत.