दुचाकीला ट्रकने उडवले; तरुणाचा जागीच मृत्यू; मोताळा तालुक्यातील दुर्घटना

 
धावत्या दुचाकीवरून पडल्याने तरुण गंभीर, मोताळा तालुक्‍यातील अपघात
मोताळा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः गाडीत पेट्रोल भरल्यानंतर रस्ता ओलांडणाऱ्या दुचाकीस्वार तरुणाला भरधाव ट्रकने उडवले. यात त्‍याचा जागीच मृत्यू झाला. मोताळा- मलकापूर रोडवरील सेवागिरी पेट्रोलपंपाजवळ आज, १२ जानेवारीला सकाळी साडेअकराच्या सुमारास हा अपघात झाला. शेख रहीम शेख गुलाब (२१, रा. जयपूर, ता. मोताळा) असे अपघातात ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे.

पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, शेख रहीम हा दवाखान्याच्या कामासाठी आज मोताळा येथे आला होता. सेवागिरी पेट्रोलपंपावर पेट्रोल भरण्यासाठी रस्ता ओलांडून जात असताना त्याच्या दुचाकीला मलकापूरकडून येणाऱ्या ट्रकने (क्र. एमएच २८ बी ७६८४) जोरदार धडक दिली. यात रहीमच्या डोक्याला मार लागला.

सिंदखेड राजा येथे बंदोबस्तासाठी जात असलेले महामार्ग पोलीस मदत केंद्र मलकापूरचे पोलीस निरीक्षक गणेश गिरी यांनी तातडीने त्यांच्या शासकीय वाहनात शेख रहीम याला मोताळा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. अपघातानंतर नागरिकांनी ट्रकचालकाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. याप्रकरणी मृतक शेख रहीमचे मामा अहमद खान हाफीज खान यांनी बोराखेडी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून अपघातास कारणीभूत ठरलेला ट्रकचालक राजू विठ्ठल वाघमारे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.