मुरादपुरजवळ सापडलेल्या बॅगचा तपास लागला अन्...

 
चिखली(ऋषी भोपळे:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): चिखली तालुक्यातील मुरादपुर फाट्याजवळ सापडलेल्या बॅग चा उलगडा झाला आहे. मुरादपुर फाट्याजवळ असलेल्या खडकपूर्णा कॅनॉल जवळ एक बेवारस बॅग सापडली, बॅग नेमकी कुणाची याबाबत तर्क वितर्क वर्तवण्यात येत होते. २३ जानेवारीला असोला शिवारात झालेल्या मर्डर प्रकरणाशी काही संबंध आहे का याबाबत देखील पोलिसांनी तपासला प्रारंभ केला होता..आता अखेर "ती" बॅग कुणाची याचा उलगडा झाला आहे..
 मुरादपुर येथील खडकपूर्णा कॅनॉल जवळ एक बॅग सापडली होती, त्या बॅग मध्ये सीए च्या परीक्षेची तयारी करण्यासाठी आवश्यक पुस्तके व तरुणीचे कपडे व सौंदर्य प्रसाधने सापडली होती. शिवाय पुस्तकावर स्नेहा कोठारी नाव लिहिलेले दिसले होते. याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी वेगवेगळ्या अँगल ने तपासाला प्रारंभ केला होता. असोला मर्डर प्रकरणातील तरुणीच्या हातावर sk गोंधलेले होते आणि जी बॅग सापडली त्यातील पुस्तकांवर स्नेहा कोठारी नाव होते, त्यामुळे स्नेहा कोठारी कोण? बॅग तिथे कशी आली याबाबत तर्कवितर्क वर्तवण्यात येत होते. बुलडाणा लाइव्ह ने त्या अनुषंगाने वृत्तदेखील प्रकाशित केले होते. अखेर ती बॅग कोणाची, ती तिथे कशी आली याबद्दलचा उलगडा झाला आहे..
   असा झाला उलगडा...
मुरादपुर फाट्याजवळ सोडलेली बॅग ही चिखली येथील स्नेहा कोठारी या तरुणीची असल्याचे समोर आले आहे. तरुणी पुण्याला शिकते. २९ फेब्रुवारीला पुण्याला जात असताना ट्रॅव्हलच्या डिक्कीचा दरवाजा उघडल्याने ती बॅग रस्त्यावर पडली. ही बॅग मुरादपुर येथील काही तरुणांना दिसली, मात्र त्यांनी याबाबत अधिक काही न करता बॅग रस्त्याच्या कडेला ठेवली. त्यानंतर कुणीतरी ती बॅग रस्त्यापासून काही मीटर अंतरावर ठेवली. दरम्यान काल, मुरादपूर येथील शेतकरी टेकाळे यांना ती बॅग दिसली होती. पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी बॅग ताब्यात घेत, तपासाची चक्रे फिरवली. बुलडाणा लाइव्ह ने वृत्त प्रकाशित केल्यानंतर चिखलीतील स्नेहा कोठारी च्या कुटुंबीयांनी पोलिसांशी संपर्क केला अन् सगळ्या प्रकरणावर पडदा पडला..त्या बॅगचा आणि असोला मर्डर प्रकरणातील मुलीचा काहीएक संबंध नसल्याचे समोर आले..