Amazon Ad

ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्न फसला! खामगाव शेगाव रोडवर पोलीस कर्मचाऱ्याची कार एसटी बसवर धडकली! कारचा चक्काचूर! पोलिस कर्मचाऱ्यासह महिला गंभीर! अकोल्याला हलवले

 
खामगाव(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): खामगाव शेगाव रोडवर आज,२५ जूनच्या दुपारी भीषण अपघात झाला. ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या नादात कार विरुद्ध दिशेने येणाऱ्या एसटी बसला धडकली. या भीषण अपघातात कार मधील पोलीस कर्मचाऱ्यासह त्यांच्या सोबत असलेली ३० वर्षीय महिला गंभीर जखमी झाली. अपघातात गंभीर जखमी झालेले अरविंद भाऊलाल बडगे (४०, रा.खामगाव) हे खामगावच्या शिवाजीनगर पोलिस स्टेशनला कार्यरत आहेत. त्यांच्यासोबत सुनीता खराटे (३०, रा. शिवाजीनगर,खामगाव) ही महिला देखील गंभीर जखमी झाली आहे. दोघे शेगाव वरून खामगावकडे परतत होते. सुनिता खराटे महिला अरविंद बडगे यांची कोण आहे हे अद्याप कळू शकले नाही.
प्राप्त माहितीनुसार अकोट आगाराची बस (एम एच ४०, एन ८२७६) खामगाव वरून शेगाव मार्गे अकोटकडे जात होती. त्यावेळी शेगाववरून येणाऱ्या अरविंद भाऊलाल बडगे यांच्या कारने एका ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्न केला. तो असफल झाला आणि विरुद्ध येणाऱ्या अकोट आगाराच्या बसला कारची जबर धडक बसली. जयपूर लांडे फाट्याजवळ झालेल्या या अपघातात कारमधील दोघांसह एसटी बस मधील कु.आराध्या सागर शेलोकार (५, रा.अंजनगाव सुर्जी), दीप्ती नामदेव चांदुरकर(१४, रा. कुटासा,ता.अकोट), सौ.लता प्रकाश वानखेडे(६५, रा. वडनेर गंगई ता.अकोट), रुपाली सागर शेलकर (२५, रा. अंजनगाव सूर्जी) हे किरकोळ जखमी झाले आहेत. बसमधील जखमींना खामगावच्या सामान्य रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले तर बसमधील पोलीस कर्मचाऱ्यासह महिलेवर खामगावच्या सिल्व्हर सिटी रुग्णालयात उपचार केल्यानंतर त्यांना अकोला येथे हलविण्यात आले आहे.