संसाराची राखरांगोळी; शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत लाखोची रोकड, साहित्य जळून खाक ! साखरखेर्डा येथील घटना..

 
साखरखेर्डा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : साखरखेर्डा येथे एका घरात अचानक झालेल्या शॉर्टसर्किट मुळे अग्नितांडव झाल्याची घटना काल सोमवार रात्री घडली होती. या घटनेत लाख रुपयांची रोकड, महत्वाची कागदपत्रे तसेच साहित्य जळून खाक झाल्याने संसाराची राख रांगोळी झाल्याचे विदारक चित्र आहे. 
प्राप्त माहितीनुसार, साखरखेर्डा येथील गुजरी चौक परिसरात मोहम्मद हनीफ मोहम्मद शरीफ यांच्या घरात शॉर्टसर्किट मुळे आग लागली होती. घरी कोणीच नसल्याने सुदैवाने या दुर्घटनेत जीवित हानी झाली नाही. त्यावेळी जवळील एका घरामध्ये लग्नाची लगबग सुरू असल्याने, शेजारचे कुटुंब जागी होते. आगीचे रोद्ररूप पाहताच शेजारच्यानी तातडीने आग विझवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले. दरम्यान तलाठींनी केलेल्या पंचनामानुसार या अग्नि तांडवात लाकडी फर्निचर, एलईडी टीव्ही, वाशिंग मशीन, फ्रिज, तसेच लोखंडी कपाट व त्यात ठेवलेली एक लाख दहा हजार रुपयांची रोकड असे एकूण २ लाख ३० हजार ८०० रुपयांचे नुकसान झाले आहे. शिवाय महत्त्वाची कागदपत्रे देखील जळून खाक झालेले आहेत. या घटनेमुळे मोहम्मद हनीफ यांचा संसार उघड्यावर आला आहे. शासनाने तातडीने मदत केली पाहिजे अशी आर्त मागणी होत आहे.