फेसबुक हॅकिंगचे प्रमाण वाढले! मेसेंजरवर मॅसेज करून होतेय पैशांची मागणी;शासकीय अधिकारी, कर्मचारी अन् उद्योगपतीही रडारवर!

 
facebook

बुलडाणा(अनंता काशीकर:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): 'मेरे दोस्त की छोटी लडकी के हार्टका ऑपरेशन है, कुछ पैसे चाहिए, सुबह तक लौटाऊंगा' असे आणि यासारख्या अनेक अडचणी सांगुन फेसबुक हॅकर्सचा पैसे उकळण्याचा धंदा जोरात सुरु आहे. फेसबुक हॅक करुन किंवा तसेच दुसरे अकाऊंट काढून त्यामधे सेम माहिती भरायची, नवीन रिक्वेस्ट टाकायची अन् लागलीच मेसेंजरवर हाय, हॅलो करून पैशाची मागणी करायची. धक्कादायक बाब म्हणजे वरिष्ठ शासकीय अधिकारी, कर्मचारी किंवा बडे उद्योगपती हॅकर्सच्या रडारवर असल्याचे वास्तव समोर येत आहे.

 सोशल मिडीयासारखं प्रभावी माध्यम सध्या आधुनिकीकरणाने जगाला उपलब्ध करुन दिले आहे. अर्थात याचा जितका फायदा आहे तितकेच तोटे देखील समोर येताना दिसत आहेत. वेगवेगळ्या माहितीचे आदान-प्रदान करण्यासाठी सोशल मीडिया कडे पाहिले जात मात्र हाच सोशल मीडिया आता फसवणुकीचा धंदा बनला आहे. यामध्ये प्रामुख्याने फेसबूक चा वापर केला जात असल्याने सायबर विभागाच्या डोक्याचा ताण वाढला आहे.

 फेसबुक या बहुचर्चित व सर्वाधिक युजर्स असणाऱ्या माध्यमातून सध्या सर्रासपणे लोकांना मुर्ख बनविण्याचा धंदा सुरु आहे.यामध्ये पहिला प्रकार म्हणजे आहे त्या नावाचे सेम प्रोफाइल फोटो व इतर माहिती भरून  दुसरे अकाउंट काढायचे किंवा एखाद्याचे अकाऊंट हॅक करून मेसेंजरवर कब्जा करून लागलीच त्याला हाय, हॅलो असे मेसेज करायचे . समोरून प्रतिसाद मिळताच मराठी अथवा हिंदी भाषेत अत्यंत महत्वाची अडचण सांगितली जाते, आणि बकरा गंडला आहे असे दिसताच त्याला 'गुगल पे' अथवा 'फोन पे' नंबर दिला जातो. यामुळे कोणत्याही खात्रीशिवाय मित्राला केलेली आर्थिक मदत मित्राला न पोहचता एका चोराला मिळाली आहे हे उशिरा लक्षात येते. पण तोपर्यंत पाणी पुलाखालून गेलेले असते. आता यामध्ये सर्वसामान्य लोक नगण्य आहेत मात्र जवळपास आयपीएस, आयएएस अधिकारी, वरिष्ठ पोलीस अधिकारी व कर्मचारी व बड्या उद्योगपतींची फेसबुकअकाऊंट हॅक झाल्याच्या घटना घडल्या आहेत.  यामुळे अशा मोठमोठ्या लोकांच्या नावाने फसवणूक होत आहे.
असे रहा सुरक्षित..

फेसबुक हॅकिंगचे प्रकार वाढल्याने नवी डोकेदुखी समोर आली आहे. त्यासाठी आपले फेसबुक अकाऊंट सुरक्षित  करा. नविन अथवा अनोळख्या फ्रेंड्स रिक्वेस्ट स्वीकारू नका. एकाच नावाची दुसरी रिक्वेस्ट आली तर त्यासंबंधी पहिल्यांदा क्रॉस चेकींग करुन मगच रिक्वेस्ट घ्या. पैशाची मागणी झाल्यास खोट्या भुलथापांना बळी पडू नका, असे काही घडल्याचे लक्षात येताच लगेचच नजिकच्या पोलीस स्टेशनची संपर्क साधा.