कोलवडजवळ पकडलेले "ते" १५ क्विंटल कच्चे मांस गोवंशाचेच? गोवंशीय मांस वाहतूकप्रकरणी सिल्लोडच्या शेख गुलाम अहमद व शेख आवेज विरुद्ध गुन्हा दाखल!

सिल्लोडला घेऊन जात होते पण कत्तल कुठे झाली? बुलडाणा पोलिसांसमोर तपासाचे आव्हान; कत्तल करणाऱ्यांचा शोध घेण्याची होतेय मागणी..
 
Bznxn
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलडाणा धाड रस्त्यावरील कोलवड गावाजवळ बुलडाणा एलसीबी पथकाने काल सायंकाळी कच्चे मांस भरलेला ट्रक पकडला होता. या कारवाईने एकच खळबळ उडाली होती. विशेष म्हणजे बुलडाणा शहरातील धाड नाक्याजवळुन काही तरुण या ट्रकला लटकून ट्रक थांबवण्याचा प्रयत्न करीत असल्याचे व्हिडिओ आता समोर आले आहेत. दरम्यान रात्री उशिरा बुलडाणा शहर पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले असून दोघे आरोपी सिल्लोडचे आहेत.
 टीम एलसीबीच्या वतीने नापोका पुरुषोत्तम आघाव यांनी या प्रकरणाची तक्रार दिली आहे. पशुवैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या पोलिसांनी केलेल्या पंचनाम्यानुसार जप्त केलेल्या कच्च्या मासांची किंमत जवळपास ३ लाख रुपयांची असून जप्त करण्यात आलेला ट्रक १० लाख रुपयांचा आहे. ट्रकमधील मांस कशाचे याचा नेमका अहवाल यायला एक दोन दिवसांचा अवधी लागणार असला तरी ट्रकमध्ये सापडले प्राण्यांच्या कातडीचे अवशेष यावरून सदर मांस गोवंशाचेच असल्याचे स्पष्ट होत आहे. मांस भरलेला ट्रक सध्या बुलडाणा शहर पोलिस स्टेशनच्या आवारातच असून नगरपालिकेच्या परवानगीने त्याची विल्हेवाट लावण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. याप्रकरणी ट्रकचालक शेख गुलाम अहमद अब्दुल रहीम शेख (रा.स्नेह नगर,सिल्लोड) व शेख आवेज उर्फ बबलू शेख वाहेद ( भारत नगर सिल्लोड) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून ते अटकेत आहेत.
पोलिसांना शोधावी लागतील या प्रश्नांची उत्तरे..
दरम्यान या यशस्वी कारवाईनंतर पोलिसांसमोर आणखी नवे प्रश्न "आ" वासून उभे आहेत. मांस भरलेला ट्रक सिल्लोडला जात असल्याचे समोर आले असले तरी ट्रक मध्ये मांस कुठे भरल्या गेले याचा तपास पोलिसांना करावा लागणार आहे. बुलडाणा जिल्ह्यात जर गोवंशीय जनावरांची कत्तल होत असेल तर ती कुठे होत आहे, कत्तल करणारे कोण आहेत? भाकड जनावरे म्हणून चांगल्या जनावरांची कत्तल तर होत नाही ना? चांगल्या जनावरांना भाकड जनावर असल्याचे प्रमाणपत्र देणारे काही गुरांचे डॉक्टर या काळ्या धंद्यात समाविष्ट आहेत का याचा शोध आता पोलिसांना घ्यावाच लागणार आहे. तशी मागणीच हिंदुत्ववादी संघटनांकडून होत आहे ...