तलावात पोहणे जीवावर बेतले! गाळात फसून मृत्यू; घटना मोताळा तालुक्यातील

 
crime
 मोताळा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): मोताळा तालुक्यातील मूर्ती फाट्यावरील हरमोड तलावात बुडून २० वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. काल,१९ एप्रिलला ही घटना उघडकीस आली. अभिषेक भारत आडवे असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.
 

 बुलडाणा तालुक्यातील माळविहीर येथील आडवे कुटुंब वाघजाळ फाट्यावर वास्तव्यास आहे. त्यांना वारुळी शिवारात ई - क्लास ची ५ एकर शेती मिळाली आहे. त्या शेतीवर आडवे कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. अभिषेक १८ एप्रिलच्या संध्याकाळी लवकर घरी परतला नाही, त्यामुळे त्याचा शोध सुरू केला. रात्री ८ च्या सुमारास त्याचे कपडे मूर्ती फाट्यावरील हरमोड तलावाच्या काठावर आढळले. पोकलेन मशिनच्या साहाय्याने त्याचा गाळात फसलेला मृतदेह बाहेर काढण्यात आला. तो पोहायला गेला असावा आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला असावा असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. अभिषेक च्या पश्यात दोन भाऊ व आई असा परिवार आहे. बोराखेडी पोलीस ठाण्यात याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.