५० हजारांच्या कर्जपायी शेतकऱ्याची आत्महत्या! सुडी झाकण्यासाठी शेतात जातो म्हणे पण... भोरसा भोरसी येथील घटना
Sun, 5 Mar 2023

चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): ५० हजार रुपयांच्या कर्जपायी शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना चिखली तालुक्यातील भोरसा भोरसी येथे ४ मार्चला घडली. संजय रामराव गवई (५५) असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार संजय गवई यांच्याकडे एका बँकेचे ५० हजार रुपयांचे कर्ज होते. भोरसा भोरसी शिवारात त्यांच्याकडे एक एकर शेती आहे. मात्र सततच्या नापिकीमुळे ते अडचणीत होते. दरम्यान ४ मार्च रोजी पावसाची शक्यता असल्याने शेतातील हरभऱ्याची सुडी झाकायला जातो असे सांगून ते शेतात गेले.
मात्र बराच वेळ होऊनही ते परत न आल्याने शोध घेतला असता शेतातील बाभळीच्या झाडाला त्यांचा मृतदेह लटकलेला दिसला. त्यांच्या पश्यात पत्नी, २ मुले, २ मुली व बराच मोठा आप्त परिवार आहे. याप्रकरणी अमडापूर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.