...तिथून तुम्‍ही १०० मीटर दूरच राहा!; बुलडाणा पोलिसांची सूचना

दिवाळीच्‍या शुभेच्‍छा देत म्‍हणाले, पर्यावरण दिवाळी साजरी करा!
 
पोलीस अधीक्षक कार्यालय
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः दिवाळी साजरी करताना सर्वोच्च न्यायालय, हरित लवादांचे आदेश व सूचनांचे सर्व नागरिकांनी पालन करावे. शुद्ध हवा व शांततामय जीवनाचा नागरिकांचा हक्क अबाधित रहावा यासाठी पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करावी, असे आवाहन बुलडाणा पोलिसांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

दिवाळीसाठी फटाक्यांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. बहुतांश फटाके घातक असतात. त्याच्या जास्त वापरामुळे हवेचे प्रदूषण होते. स्फोटक आवाजामुळे रहिवाशांना धोका निर्माण होतो. हवा प्रदूषित झाल्याने लोकांचे डोळे, नाक, कान व फुफ्‍फुसांवर विपरीत परिणाम होतो. त्यामुळे उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रुग्णालय, न्यायालय, नर्सिंग होम, धार्मिक स्थळे, शैक्षणिक संस्थांच्या १०० मीटर परिसरात फटाके वाजविण्यास मनाई आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार रात्री ८ ते १० या दोन तासांच्या वेळेतच फटाके फोडावेत, अशा सूचना पोलिसांनी केल्या आहेत. फटाके गर्दीच्या ठिकाणी उडवू नयेत. मोठ्या आवाजांचे फटाके फोडू नयेत. लहान मुले फटाके फोडत असतील तर घरातल्या मोठ्यांनी त्यांच्याजवळ उभे रहावे. वाहनांजवळ फटाके फोडू नयेत. विजेचे खांब, डीपी याजवळ फटाके फोडू नयेत. सिरीजचे फटाके (लड) फोडू नये. मोठे आवाज  होणाऱ्या फटाक्यांपेक्षा आसमंत उजळवून टाकणारे फटाके फोडावेत. अरूंद रस्ता आणि दाट वस्तीमध्ये रॉकेट उडवू नये. अनुचित प्रकार घडल्यास ताबडतोब पोलीस ठाण्याशी संपर्क करावा. पोलीस नियंत्रण कक्ष बुलडाणा येथील ०७२६२-२४२४०० या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करत बुलडाणा पोलिसांनी नागरिकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.