...म्‍हणून नियम मोडणारे बहाद्दर आता पोलिसांपुढे जोडताहेत हात!

सहाच दिवसांत भलामोठा दंड वसूल!! 
 
file photo
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : १२ डिसेंबरपासून लागू झालेल्या नवीन वाहतूक नियमांची अंमलबजावणी वाहतूक शाखेने बुलडाण्यात सुरू केली आहे. वारंवार नियमांची पायमल्ली करणाऱ्यांना आता मोठा दंड चुकवावा लागत आहे. बुलडाणा शहर वाहतूक शाखेने गेल्या ६ दिवसांत ११६ जणांवर दंडात्‍मक कारवाई केली असून, यातून ६१ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.

वाहतुकीचे नियम पाळण्यात न आल्याने अपघाताचे  प्रमाण वाढल्याचा निष्कर्ष केंद्र सरकारने काढला होता. अल्पवयीन मुले सुसाट वाहने चालवत होते. विना परवाना विना नंबर प्लेट, विना हेल्मेट वाहन चालविण्याचे प्रकारही वाढले होते. दंडाची रक्कम कमी असल्याने नियम मोडले तरी वाहनचालक सुटका करून घेत होते. त्यामुळे वाहतूक नियम धाब्यावर बसवले जात होते. अपघाताच्या वाढत्या घटना रोखण्यासाठी व शिस्तबद्ध वाहतुकीसाठी केंद्र सरकारने मोटार वाहतूक कायद्यात सुधारणा करून दंडाची रक्कम वाढविण्याचा निर्णय घेतला. त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी १२ डिसेंबरपासून सुरू करण्यात आली आहे.

असा होणार आता दंड...
विनापरवाना वाहन चालविणे-५ हजार रुपये दंड, वाहन चालविण्यास अपात्र असताना वाहन चालविणे- १० हजार रुपये, विना नोंदणी वाहन- २ हजार रुपये, विना विमा प्रमाणपत्र- २ हजार रुपये रुपये, फॅन्सी नंबर प्लेट- १ हजार रुपये, विना हेल्मेट- ५०० रुपये दंड व परवाना रद्द, भरधाव वाहन चालविणे- ५ हजार, कर्णकर्कश आवाज - १ हजार, वेगाचे उल्लंघन-४ हजार, रुग्णवाहिका व अग्निशामक वाहनाला अडथळा निर्माण केल्यास १० रुपये दंड आकारण्यात येणार आहे.