जिल्ह्यात समृध्दी महामार्गावर आतापर्यंत ५३ अपघात! १० जणांचा घेतला जीव! जिल्ह्यातील इतर रस्तेही सुरक्षित नाहीत, २ महिन्यांत ९९ अपघात! कालचा अपघात सर्वात मोठा..

जाहिरात👆
नागपूर मुंबई या समृध्दी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे ११ डिसेंबर रोजी लोकार्पण झाले. राज्यातील ११ जिल्ह्यांना जोडणारा हा महामार्ग जिल्ह्यातून ८५ किलोमिटर जातो. या महामार्गावर कारसाठी १२० व अवजड वाहनांना ८० एवढी वेगमर्यादा ठेवण्यात आली आहे. मात्र असे असले तरी अनेक वाहनधारक हे सुसाट वाहने चालवतात, त्याचाच परिणाम अपघाताच्या संख्येवर दिसून येतो.
जिल्ह्यातील इतर रस्तेही असुरक्षित...
जिल्ह्यातील इतर जिल्हा मार्ग , राज्य महामार्ग व राष्ट्रीय महामार्ग हे सुद्धा सुरक्षित नसल्याचे आकडेवारीवरून समोर येतेय. २०२३ या वर्षात जिल्ह्यात आतापर्यंत ९९ अपघातांची पोलीस दप्तरी नोंद आहे. या ९९ अपघातात ५० जण देवाघरी गेले तर अनेक जण जायबंदी झाले.
कालचा अपघात थरकाप उडवणारा..!
काल,१२ मार्चच्या सकाळी समृध्दी महामार्गावर मेहकर पासून २० किमी अंतरावरील शिवणी पिसा गावाजवळ इर्टिगा कारचा झालेला अपघात काळजाचा थरकाप उडवणारा होता. छत्रपती संभाजी नगरवरून बर्वे आणि बोरुडे कुटुंब शेगावला श्री.संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी येत होते. लहान मोठे धरून वाहनात तब्बल १२ जण होते. लवकर पोहचता यावे म्हणून त्यांनी समृध्दी महामार्गाने जायचा निर्णय घेतला,मात्र कालचा दिवस या दोन्ही कुटुंबासाठी काळच घेऊन आला होता.
लोणार तालुक्यातील शिवणी पिसा गावाजवळ कार पोहचताच क्षणात होत्याचं नव्हते झाले, अतिवेगाने कारवरील नियंत्रण सुटल्याने कार रस्त्याच्या कडेला धडकून खाली उलटली अन् बर्वे कुटुंबातील ३ व बोरुडे कुटुंबातील ३ अशा ६ जणांचा मृत्यू झाला. समृध्दी महामार्गावरील हा अपघात आतापर्यंतचा सर्वात मोठा अपघात ठरला.