"सर मी पाणी प्यायला उठलो अन् तेवढ्यात..."मेहकर तालुक्यातील भालेगावचा योगेश काचा फोडून बसच्या बाहेर पडला..!

"बुलडाणा लाइव्ह" ला सांगितला अपघाताचा आखो देखा हाल..! म्हणाला, "लोक किंचाळत होती, ओरडत होती पण काहीच करता येत नव्हत, पोलीस आले,गावकरी आले पण तोपर्यंत सगळ संपल होत..."

 
ghfghj
देऊळगावराजा( राजेश कोल्हे: बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलडाणा जिल्हाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राला शोकसागरात बुडवणारा अपघात आज जिल्ह्यातील सिंदखेडराजा तालुक्याच्या हद्दीतील समृध्दी महामार्गावर झाला. विदर्भ ट्रॅव्हल्स कंपनीची खासगी बस नागपूर वरून पुण्याकडे जात असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या कडेला असलेल्या खांबाला धडकली. त्यानंतर उलटली आणि काही क्षणांत बसने पेट घेतला.बसमधील ३३ पैकी २६ प्रवाशांचा जळून मृत्यु झाला, मृतदेहांचा  अक्षरशः कोळसा झाला असून मृतदेहाची ओळख देखील पटत नाही. विदर्भ ट्रॅव्हलच्या नागपूर कार्यालयाने बसमधील प्रवाशांची यादी दिली असली तरी त्यातील काही नावे अर्धवट लिहिलेली असल्याने प्रवाशांची नावे कळायला अवघड होत आहे. अपघातातून  वाचलेल्या ७ जणांची नावे समोर आली असून त्यातील काहींवर देऊळगावराजात तर काहींवर छत्रपती संभाजीनगरात उपचार सुरू असल्याची माहिती आहे. दरम्यान मेहकर तालुक्यातील भालेगाव येथील २३ वर्षीय तरुण योगेश गवई या अपघातातून सुदैवाने वाचला असून त्याच्यावर देऊळगावराजात उपचार सुरू आहेत. घटनेच्या वेळी पाणी पिण्यासाठी योगेश उठला अन् तेवढ्यात अपघात झाला. काही कळायच्या आत बसने पेट घेतला, त्यावेळी त्याच्या सोबत प्रवास करत असलेल्या मित्राच्या आणि एका प्रवाशाच्या मदतीने काचा फोडून तो बाहेर आला. तिघांनी मिळुन आणखी एकाला खिडकीतून बाहेर काढून वाचवले. बसच्या केबिन मध्ये बसलेले चालक आणि क्लिनरदेखील वाचले आहेत. ते बसच्या समोरील भागातून बाहेर निघाले. दरम्यान देऊळगावराजात उपचार घेत असलेल्या योगेशने "बुलडाणा लाइव्ह" ला अपघाताचा आखो देखा हाल सांगितला..माझ्या डोळ्यांनी मृत्यू बघितल्याचे तो म्हणाला..!
 

   
मूळचा मेहकर तालुक्यातील भालेगाव येथील असलेला योगेश एका कंपनीत छत्रपती संभाजी नगरात नोकरीला आहे. कंपनीच्या कामासाठी तो त्याचा कंपनीतील सहकारी मित्र साईनाथ पवार(१९) याच्यासोबत नागपुरला गेला होता.
काल ३० जूनच्या संध्याकाळी साडेसहाला नागपुरातून दोघेही छत्रपती संभाजी नगरला जाण्यासाठी बसले होते. 

१९ आणि २० नंबरच्या बेडवर दोघेही होते. कारंजा लाड फाट्याजवळ जेवण करण्यासाठी बस समृध्दी महामार्गावरून खाली उतरली, त्यानंतर जेवण करून आम्ही पुन्हा समृध्दीवर चढलो असे योगेश सांगत होता. जेवणानंतर बसमधील प्रवाशी निवांत झोपलेले होते.

  "मध्यरात्री दीडच्या सुमारास मी पाणी पिण्यासाठी उठलो. बसच्या आतील लाईट बंद होते. तेवढ्यात बस उलटली, माझ्या पायाला ,हाताला मुक्का मार लागला. बस उलटल्याने सगळे प्रवाशी झोपेतून उठले मात्र नेमके काय झाले हे कुणाला कळायच्या आत बसने पेट घेतला. बस उलटने आणि पेट घेणे या दोन्ही गोष्टी सोबत झाल्या. गाडीत पडदे, गाद्या,कपडे असल्याने बस झपाट्याने पेटत होती. आम्ही मागच्या बाजूला असल्याने थोडा वेळ मिळाला. तेवढ्यात माझा मित्र आणि आमच्या मागच्या सीटवर असलेल्या एकाच्या मदतीने काचा फोडल्या. आम्ही तिघे बाहेर आलो आणि एकाला हात देऊन खिडकीतून बाहेर काढले" असे योगेशने सांगितले.

   मात्र अधिकच्या प्रवाशांना वाचवता आले नाही, बसमधून ओरडण्याचा किंचाळण्याचा आवाज येत होता मात्र आता बस जवळ जाताही येत नव्हते. काही मिनिटांत बस मधील प्रवाशांचा आवाज येणे बंद झाले.  १५ ते २० मिनिटांत पोलीस, गावकरी , अग्निशामक विभाग तिथे पोहचले .परंतु तोपर्यंत काहीच उरले नाही सांगताना योगेशला अश्रू अनावर झाले होते.