तुमचं ध्यान नसल्यानं तिचं ध्यान भरकटतंय...; पाल्य पळून जाण्याचे संकेत मिळतात आधीच....!

 
File Photo

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात या वर्षभरात शेकडो महिला, मुली, तरुणी बेपत्ता झाल्या आहेत. त्‍यातल्या अर्ध्याहून अधिक परत आणण्यात पोलिसांना यशही आले. पळून जाणाऱ्यांत तरुणींचे प्रमाण मोठे आहे. अल्पवयीन मुलींचे प्रमाणही लक्षणीय आहे पण त्‍यांची नोंद अपहरणात होते. गेल्या ऑक्‍टोबर महिन्यातच तब्‍बल ३६ तरुणी, महिला, मुली बेपत्ता झाल्या आहेत. घर सोडून जाण्याची कारणे अनेक असली तरी प्रमुख कारण मात्र प्रेमप्रकरणं असल्याचं समोर आलं आहे. जिना मरना तेरे संग म्‍हणत... रात्रीबेरात्रीही मुली, तरुणी पळून गेल्या आहेत. विशेष म्‍हणजे आपली मुलगी असे काही करेल याचा थांगपत्ताही पालकांना नसतो. ती गायब झाल्यानंतर मनस्ताप, थयथयाट आणि तपासासाठी पोलिसांवर दबाव आणण्याचे प्रकार घडतात. बरं पाल्याचा शोध घ्या, तोही गुपचूप त्‍याची खबर "मीडिया'ला लागू देऊ नका, अशी सूचनाही होते. फोटो प्रसिद्ध केला तर किमान बेपत्ता व्यक्‍ती सापडण्याची शक्‍यता कितीतरी पटीने वाढते. पण या पालकांना बदनामीचीही भीती वाटते. मुलगी कुणाचा तरी हात धरून पळूनच गेली आहे, हे त्‍यांना माहितेय. पण त्‍याआधी तसे संकेत ओळखण्यात ते कसे कमी पडतात, हा खरा प्रश्न आहे!

गेल्या महिन्यात एकूण ६६ महिला, पुरुष बेपत्ता झाले आहेत. यात १८ ते २६ वयोगटातील मुली तब्‍बल २८ आहेत, तर विशीच्या आतील २० मुली आहेत. तरुण मुलांचे बेपत्ता होण्याचे प्रमाण तसे कमी आहे. केवळ ११ तरुण बेपत्ता झाल्याची नोंद गेल्या महिन्यात आहे. मुलगा का गायब झाला, हे जर घरात माहीत असेल तर बेपत्ता झाल्याची तक्रारही देण्यात येत नाही. त्‍यामुळे हा आकडा कमी आहे. पण मुलगी बेपत्ता कशामुळे झाली हे अनेक पालकांना ती गायब झाल्यानंतर कळते. त्‍यानंतर तक्रार तर देण्यात येते. पण सारा तपास हा अत्‍यंत गोपनीय पद्धतीने व्हायला हवा, यावर त्‍यांचा भर असतो. त्‍यामुळे पोलिसांपुढेही अनेक आव्‍हाने निर्माण होतात. अतिविश्वास आणि पाल्याप्रती असलेली बेफिकीरीच याला कारणीभूत आहे असे म्‍हणावे लागेल. सध्या टीव्‍ही आणि सोशल मीडियामुळे वातावरण दूषित झालेले आहे. त्‍यातल्या त्‍यात कोरोनामुळे घरूनच शाळा, कॉलेज स्‍मार्टफोनवर आल्याने याचाही परिणाम अशा प्रकरणांत दिसून येत आहे. पळून जाताना स्मार्टफोनची झालेली "मदत' नंतर अनेक तपासांतही समोर आली आहे. आपले पाल्य कुणाच्या संपर्कात आहे, किती वेळ बोलते, स्मार्टफोनचा वापर ती कशाकशासाठी करते, याची खबरदारी घेण्याची गरज आधी पालकांना अजिबात वाटत नाही.

प्रेम वाईट नसतेच पण...
प्रेम वाईट नसतेच. ते कुणावर होईल हेही सांगता येत नसते. पण ते प्रेम खरेच आहे हे ओळखण्यात मुली कमी पडतात. यातून त्‍यांची फसवणूक होण्याची दाट शक्‍यता असते. अशा फसवल्या गेलेल्या अनेक मुली नंतर घरी परतल्या. पण नंतर त्या घरच्यांच्या मनातून तर उरल्याच, पण स्वतःच्या मनातही त्‍यांचे स्थान राहिले नाही. समाजात तर तिला आणि तिच्या घरच्यांनाही तोंड दाखवायला जागा उरलेली नसते. त्‍यामुळे चुकीचे पाऊल उचलण्याआधी मुलींनीही विचार करण्याची गरज आहे. त्‍यांच्‍या क्षणिक मोहापायी, स्वार्थापोटी त्‍या लहानाचे मोठे करणाऱ्यांना कोणती शिक्षा देत आहेत, याची जाणीव त्‍यांनीही आधीच ठेवली तर अशा घटना बराच लगाम लागू शकतो.

पालकांनो, ध्यान ठेवा...
कायम संशयात राहू नका. पण ध्यान ठेवा. आई-वडील समाजात कायम उजळ माथ्याने वावरावेत याची काळजी घेणाऱ्या मुली आहेत. पण बोटावर मोजण्याइतक्या काही चुकीचे पाऊल टाकणाऱ्याही आहेत. त्‍यामुळे पालकांनीच नंतर मनस्ताप, थयथयाट केल्यापेक्षा आधीच काळजी घेतली पाहिजेत. कारण वातावरण सध्या "बिघडलेले' आहे. त्‍याचे शिकार आपण, आपले कुटुंब होता कामा नये!