नियतीचा क्रूर डाव!सकाळच्या एसटी बस अपघातातील मृतक सिद्धार्थची पत्नी प्रेग्नंट; ७ महिन्याआधी झाले होते लग्न!

लहान भावाचाही वर्षभराआधी झाला होता अपघाती मृत्यू; वडीलही अकालीच गेले; पोटात असलेल्या बाळाने जन्माधीच बाप गमावला! सिद्धार्थची पत्नी आणि बहिणीचा टाहो काळजात चर्र करणारा..
 
Accident
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):
वडील अकालीच गेले.  त्यांच्या नंतर कुटुंब सावरत असताना लहान भाऊ देखील अपघातात कुटुंबाला गमवण्याची वेळ आली. दुःखाचे दोन आघात कसेबसे पचवत सुरवाडे कुटुंब  जीवन संघर्ष पुढे नेत असताना कर्ता गमवण्याची दुर्देवी वेळ या कुटुंबावर पुन्हा ओढवली. आजच्या बस अपघातात अन् नियतीच्या क्रूर खेळात पोटात असलेल्या बाळाला जगात येण्याआधीच बाबा दुरावला...!
  आज,९ फेब्रुवारीची सकाळ जिल्हावासीयांची झोप उडवणारीच ठरली.. सकाळी चिखली देऊळगावराजा रोडवरील रामनगर फाट्याजवळ पुणे - शेगाव या एसटी महामंडळात नव्याने सुरू झालेल्या शयनयान गाडीचा ट्रकला मागील बाजूस धडकून अपघात झाला. या भीषण अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला तर १५ ते १६ प्रवाशी जखमी झाले. जखमीपैकी २ - ३ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. सिद्धार्थ अर्जुन सुरवाडे (३०, रा. बोरीअडगाव , ता.खामगाव ) असे अपघातात ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे. एसटी बसचे चालक एम. पी. हारगुडे यांचे दोन्ही पाय या अपघातात चेंदामेंदा झाले आहेत, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या अपघातात ठार झालेल्या सिद्धार्थच्या मृत्यूची बातमी त्याच्या गावी धडकताच गावावर शोककळा पसरली आहे..
    ७ महिन्यांपूर्वी सिद्धार्थचे लग्न झाले होते. सिद्धार्थची बायको सध्या प्रेग्नेंट आहे. ७ फेब्रुवारीला सिद्धार्थ मित्र निलेश तायडे याच्यासोबत पुण्याला गेला होता. काल सकाळी पुण्यात पोहचल्यानंतर दिवसभरात काम आटोपून १० वाजता ते पुण्याहून परतीला निघाले होते. मात्र नियतीच्या मनात वेगळेच होते, आज पहाटे रामनगर फाट्याजवळ अपघात होऊन सिद्धार्थचा मृत्यू झाला. सिद्धार्थच्या वडिलांचे अकाली निधन झालेले आहे, गेल्या वर्षी सिद्धार्थच्या लहान भावाचेही अपघाती निधन झाले होते, सिद्धार्थचा लहान भाऊ श्रीकांत हा भारतीय सैन्यात होता.
 
 नियतीचा क्रूर खेळ..
सिद्धार्थ पत्नी ,आई आणि लहान बहिणीसह राहत होता व शेतीवर उदरनिर्वाह करीत होता. आता सिद्धार्थच्या निधनानंतर त्याची आई, प्रेग्नेंट असलेली पत्नी आणि बहिणीचा आधार हरवला आहे..जन्माला यायच्या आधीच सिद्धार्थच्या पत्नीच्या पोटातील बाळाने वडिलांना गमावले आहे.सिद्धार्थ ची पत्नी आणि बहिणीचा टाहो काळजात चर्र करणारा आहे.