धक्कादायक... बुलडाण्याच्या निरीक्षणगृहातून पळाली दोन मुले!

अल्पवयीन असताना केल्या होत्या घरफोड्या
 
पलायन

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः दाढी मिसरूड न फुटलेल्या वयात घरे फोडली. आता तरुण झालेल्या दोघांना वयाच्या १५ व्या वर्षी केलेल्या कृत्‍यामुळे पोलिसांनी पकडले. पण अल्पवयात गुन्‍हे केलेल्या असल्यामुळे बुलडाणा शहरातील निरिक्षणगृहात ठेवण्यात आले होते. दोघांनी निरिक्षणगृहातून पलायन केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

१३ नोव्हेंबरच्या संध्याकाळी इतर मुले मैदानात खेळत असताना ३ मुलांनी निरीक्षण गृहातील किचनच्या मागील दरवाजाचा कडी कोंडा तोडून पळ काढला. यापैकी एका १९ वर्षीय मुलाचा शोध लागला असला तरी दोघे अजूनही बेपत्ता आहेत. बुलडाणा शहर पोलीस ठाण्यात निरीक्षणगृहातून २ मुले बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली आहे. यातील एकाचे वय सध्या २५ तर दुसऱ्याचे २३ वर्षे आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षी घरफोडीसारखे गुन्हे तिघांनी केले होते.

सध्या ते तरुण असले तरी त्यांनी गुन्हे अल्पवयीन असल्याचे असताना केल्याने त्यांना निरीक्षण गृहात ठेवण्यात आले होते. एकाला २० ऑक्टोबर रोजी, दुसऱ्याला २८ ऑक्टोबर रोजी तर तिसऱ्या १९ वर्षीय मुलाला २९ ऑक्टोबर रोजी निरीक्षण गृहात ठेवण्यात आले होते. १३ नोव्हेंबरच्या संध्याकाळी बालगृहातील विधिसंघर्षग्रस्त मुले मैदानात खेळत होती. त्याच वेळी निरीक्षण गृहातील किचनच्या मागील बाजूच्या दरवाजाची कडी कोयंडा तोडून तिघे फरार झाले. स्वयंपाकी म्हणून काम करणाऱ्या शारदा संतोष राठोड किचनमध्ये आल्या असता त्यांना दरवाजाचा कडी कोयंडा तुटलेला दिसला. यावेळी बालगृहाचे अधीक्षक महेंद्र अष्टेकर व काळजीवाहक संतोष राठोड यांनी शोध सुरू केला. तिघांपैकी एका १९ वर्षीय तरुणाला येळगाव धरणाकडे जात असताना ताब्यात घेण्यात आले. दोन जणांचा शोध मात्र अद्यापही लागला नाही.

बालगृहात यापूर्वी दोन बालकांनी केली होती आत्महत्या
याच बालगृहात दोन विधिसंघर्षग्रस्त बालकांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना काही महिन्यांपूर्वी घडली होती. आता पुन्हा २ मुले पळून गेल्याने निरीक्षणगृहाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.