"त्या" खुनाचे धक्कादायक कारण समोर! चाळिशी पार होऊनही लग्न होत नसल्याने वैतागलेल्या मुलाने केला बापाचा खून; बापाला म्हणे, लग्न करून द्या; बाप म्हणे, पोरगी कुठून आणू! जळगाव जामोद तालुक्यातील घटना

 
crime
जळगाव जामोद(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): जन्मदात्या बापाचा मुलानेच मुडदा पाडल्याची घटना जळगाव जामोद तालुक्यातील पिंपळगाव काळे शिवारात उघडकीस आली होती. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी मुलाला अटक केली होती. दरम्यान पोलीस चौकशीतून खुनाचे धक्कादायक कारण समोर आले असून लग्न होत नसल्याने वैतागलेल्या मुलाने बापाचा खून केल्याचे आता समोर आलेय.  नानसिंग भैरड्या (६०) असे खून झालेल्या दुर्दैवी बापाचे नाव असून भाऊसिंग भैरड्या असे खून करण्याऱ्याचे नाव आहे. चाळीशी उलटून सुद्धा लग्न न झाल्याने तो वैतागला होता.
 

सर्वच समाजात सध्या मुलींचा जन्मदर घसरला आहे. त्यामुळे विवाहाचे वय होऊनही अनेक तरुणांना लग्नासाठी मुली मिळत नाहीत. मुलींची संख्या कमी असल्याने मुलीकडच्या मंडळीच्या अपेक्षाही जास्त असतात, त्यामुळे तशी अपेक्षा पूर्ण करू शकणाऱ्या नशीबवान मुलांचेच लग्न जमते. कमी कमाई असणारे, बेरोजगार, मजुरी करणाऱ्यांना मात्र मुली मिळणे कठीण झालेय. त्यातच एकदा वय निघून गेले की व्यसनाच्या आहारी गेलेली ही वैफल्यग्रस्त मुले नको त्या कामात अडकतात, अनेकदा त्यांच्याकडून मोठमोठे गुन्हेही होतात. जळगाव जामोद तालुक्यातील पिंपळगाव काळे शिवारातील एका विट भट्टीवर काम करणारा भाऊसिंग भैरड्याची स्टोरी सुद्धा तशीच.
    
  भाऊसिंग भैरड्याचे वडील नानसिंग भैरड्या हे  विट भट्टीवर देखरेखीचे काम करीत होते. भाऊसिंग हा सुद्धा इतरत्र ठिकाणी मजरीचे काम करायचा तर कधी कधी वीट भट्टिवर देखील काम करायचा. चाळीशी पार होऊनही त्याचे लग्न होत नव्हते. त्यामुळे तो वैतागला होता. माझे लग्न करून द्या म्हणत सातत्याने वडीलांभोवती तगादा लावत होता. दोन दिवसांपूर्वी रात्रीच्या सुमारास दोघा बापलेकांत याच मुद्द्यावरून वाद झाला. माझे लग्न करून द्या असे भाऊसिंग म्हणत होता तर तुला मुलगी कुठून आणू असे नानसिंग यांचे म्हणणे होते. तुम्ही तिकडे काय करायचे ते करा पण लग्न लावून द्या असा तगादा भाऊसिंग ने लावला. प्रकरण मारामारीपर्यंत पोहचले. नानसिंग यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला मात्र लग्नासाठी तैवारलेल्या भाऊसिंग ने बाबूंच्या काठीने बापाला बेदम मारहाण केली. याच मारहाणीत त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी भाऊसिंग ला अटक केली असून तो सध्या पोलीस कोठडीत आहे.