राजूर घाटात धक्कादायक कांड! चौघांनी गाडी अडवली अन् विषाची बाटली तोंडाला लावली...

 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा)
: शहरालगत असलेल्या राजूर घाटात चौघांनी एकाला विष पाजून जिवे मारण्याच्या प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. बुधवार , २१ मार्चच्या रात्री ७ वाजेदरम्यान ही घटना घडली होती. यासंदर्भात बोराखेडी येथील सुभाष किसन कुटे (४४ वर्ष) यांनी तक्रार दिली. त्यावरून बुलढाणा शहरातील तेलगु नगर परिसरातील रहिवासी जयमंदा डॅनियल जाधव, जयंत डॅनियल जाधव, जगदीश डॅनियल जाधव, तसेच जयनंदा डॅनियल जाधव या चौघांविरुद्ध बोराखेडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
सुभाष कुटे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, राजुर घाटातील देवी मंदिर परिसराच्या समोरून जात असताना त्यांची गाडी चौघांकडून अडवण्यात आली. त्यानंतर जयमंदा जाधव हिने त्यांना ओढले, मी तुझ्याशी लग्न केले आहे, मला खावटी का देत नाही? असे म्हटले तितक्यात जयंत आणि जगदीश याने सुभाष कुटे यांना पकडुन ठेवले. तर जयमंदा हिने विषारी औषधाची बाटली काढली आणि कुटे यांच्या तोंडाला लावण्याचा प्रयत्न केला. संतोष कुटे विषारी औषध पिण्यापासून प्रतिकार करत होते. मात्र त्याचवेळी जयंत जाधव ने त्याच्या जवळील चाकूने कुटेंच्या मनगटावर वार केला. त्यांना लाथा बुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. तसेच शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली.
त्यांनतर संतोष कुटे यांनी काल २२ मार्च रोजी बोराखेडी पोलीस ठाणे गाठले. सगळी हकीकत सांगितली. त्यावरून गुन्हे दाखल करण्यात आले. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राजवंत आठवले करत आहेत.