धक्कादायक BREAKING! सावकाराच्या नावाची चिठ्ठी लिहून शेतकऱ्याने टोकाचा निर्णय घेतला; मनगटावरही लिहिले सावकार "सुनील तिफने" चे नाव!
२० हजार रुपयांचे सावकार मागत होता ८० हजार; मेहकर तालुक्यातील उकळीची घटना; बातमीत वाचा शेतकऱ्याने लिहिलेली चिठ्ठी...
Updated: Feb 6, 2024, 13:03 IST
मेहकर(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): मेहकर तालुक्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. सावकाराच्या जाचाला कंटाळून शेतकऱ्याने जीवन संपवले आहे, त्याआधी शेतकऱ्याने सावकाराच्या नावाची चिठ्ठी लिहून आहे. याशिवाय सावकाराचे नाव देखील मनगटावर लिहून ठेवले. मेहकर तालुक्यातील उकळी येथे आज,६ फेब्रुवारीच्या पहाटे ही घटना उघडकीस आली. उद्धव परसराम मानवतकर (६०, रा. उकळी) असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार उध्दव परसराम मानवतकर अल्पभूधारक शेतकरी आहेत. त्यांनी दोन चिठ्ठ्या लिहून ठेवल्या आहेत. मेहकर येथील सुनील तिफने पाटील त्यांचा पुतण्या आणि मुलगा अमर सुनील तिफने यांनी आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचे शेतकरी उद्धव मानवतकर यांनी चिठ्ठीत लिहून आहे.
चिठ्ठीत लिहिल्यानुसार २८ ऑक्टोबर २०२२ मध्ये शेतकरी मानवतकर यांनी सुनील तिफने यांच्याकडून २० हजार रुपये घेतले होते. त्यातील १० हजार रुपये वापस दिले होते.त्यातील १० हजार रुपये देणे बाकी होते, मात्र त्यांनी ८० हजार रुपये मागितल्याचे शेतकऱ्याने चिठ्ठीत लिहून आहे.
शेतकऱ्याने तुम्ही काय भावाने व्याज लावले अशी विचारणा केली असता "तू घरी ये हिशोब सांगतो" असे सावकाराने म्हटले होते. दिनांक २ जानेवारी २०२४ ला सुनील तिफने याचा पुतण्या आणि मुलाने शेतकऱ्याला घरी नेले. घरात गेल्यावर दरवाजा लावून शिवीगाळ केली, तू आमचे पैसे कसे देत नाही, आमचे व्याज आमच्या हिशोबाने आहे..तू जर आठ दिवसांच्या आत पैसे दिले नाही तर तुझ्या घरी येऊन टिव्ही, फ्रिज काढून घेऊ अशी धमकी सावकाराने दिली. शेतकऱ्याने सावकाराला दोन महिन्यांची मुदत मागितली, "मी येवढे पैसे देऊ शकत नाही" असे म्हटले असता सावकाराने शेतकऱ्याच्या मोटरसायकलची चाबी घेऊन हाकलून दिले, आधी पैसे आणून दे नंतर गाडी घेऊन जा असे सावकाराने म्हटल्याचे शेतकरी मानवतकर यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत म्हटले आहे. "साहेब, मी झालेला अपमान सहन करू शकलो नाही, म्हणून आत्महत्या करण्याशिवाय माझ्याकडे पर्याय राहला नाही" असेही शेतकऱ्याने हतबलतेने चिठ्ठीच्या शेवटी म्हटले आहे..
सावकारावर याआधीही गुन्हा दाखल...
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सावकार सुनील तिफने याच्यावर याआधी २०१८ मध्ये अवैध सावकारकीचा गुन्हा दाखल आहे. मात्र एवढे होऊनही सावकाराने स्वतःची नियत बदलली नाही, परिणामी एका शेतकऱ्याने मृत्यूला कवटाळले. सध्या या प्रकरणात मेहकर पोलीस पुढील कारवाई करीत आहेत.